
स्थैर्य, फलटण, दि. १२ सप्टेंबर : “निरगुडी येथील प्राथमिक शिक्षक सचिन काकडे यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने नव्हे, तर सातारा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय हलगर्जीपणामुळे, भ्रष्टाचारामुळे आणि मानसिक छळामुळे झालेला ‘संस्थात्मक खून’ आहे,” असा गंभीर आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार अमर साबळे यांनी केला आहे. फलटण येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना अमर साबळे यांनी जिल्हा परिषद प्रशासनावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “ऑनलाइन बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याऐवजी, दिव्यांग प्रमाणपत्रांच्या फेरतपासणीचा घाट घालून प्रशासनाने शिक्षकांचा अमानुष छळ सुरू केला आहे. सचिन काकडे यांच्याकडे अपघातामुळे आलेले ४१ टक्के दिव्यांगत्वाचे वैध प्रमाणपत्र असतानाही, केवळ २०२४ चे नियम लावून ते २९ टक्क्यांवर आणण्यात आले. हे पूर्णतः चुकीचे आणि अन्यायकारक आहे.”
“शिक्षकांना पोलीस कारवाई आणि निलंबनाच्या धमक्या देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा हा प्रकार आहे. कराड येथील हॉटेलमध्ये बसून ‘अपात्र दिव्यांग’ यादीतून नाव वगळण्यासाठी पैसे मागितले जात आहेत. हा सर्व प्रकार म्हणजे ‘मुगलशाही’ असून, आम्ही हे खपवून घेणार नाही,” असा इशाराही साबळे यांनी दिला.
साबळे पुढे म्हणाले, “जर प्रशासनाला ही प्रमाणपत्रे बनावट वाटत असतील, तर त्यांनी ती प्रमाणपत्रे देणाऱ्या मूळ वैद्यकीय मंडळांवरही कारवाई करावी. अनेक शिक्षकांनी या प्रकरणी न्यायालयात दाद मागितली असतानाही, त्यांच्यावर कारवाई करणे हा न्यायालयाचा अवमान आहे. विशिष्ट जातीच्या शिक्षकांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून, त्यांची अडवणूक केली जात आहे. हा प्रकार न थांबल्यास, संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आम्ही ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करू.”
“प्रशासनाने आपला मनमानी कारभार थांबवून, शिक्षकांचा छळ थांबवावा आणि सचिन काकडे यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणीही अमर साबळे यांनी यावेळी केली.