फलटण येथे पहिली ते बारावीच्या शिक्षकांचे ‘शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण २.०’ उत्साहात संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ३ मार्च २०२५ | फलटण |
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण व पंचायत समिती फलटण शिक्षण विभागातर्फे श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनियर कॉलेज फलटणमध्ये नवीन शैक्षणिक धोरण २०२० (एनईपी ट्रेनिंग २.० शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण) संपन्न झाले. हे प्रशिक्षण तीन टप्प्यात पार पडले.

यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० विषयक वैशिष्ट्ये, स्वरूप, कौशल्य राबवणूक, शालेय शिक्षण नवीन आकृतीबंध (५+३+३+४), समग्र प्रगतीपत्रक, स्क्वॉफ याविषयी सविस्तर माहिती प्राथमिकचे सुलभक म्हणून सौ. कुंभार, श्री. लटिंगे, श्री. भोसले, श्री. नाळे व माध्यमिक सुलभक म्हणून श्री. सस्ते, श्री. शिपटे, श्री. सावंत, श्री. कावळे, श्री. मिलिंद शिंदे, सौ. कांबळे, सौ. निंबाळकर यांनी दिली.

फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील खाजगी शिक्षण संस्थेतील प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिकच्या सर्व अनुदानित म्हणजेच इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व शिक्षकांचा सहभाग होता. आपल्या क्षमतावृद्धीसाठी शासनाने ज्या ध्येयधोरणांनी हे प्रशिक्षण दिले त्याचा अभ्यास करून आपले सहभाग नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त केले.

या प्रशिक्षणासाठी फलटण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अनिल संकपाळ तसेच अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण, सातारा श्री. डॉ. सतिश फरांदे व तालुका समन्वयक विषय साधनव्यक्ती बी. आर. सी. फलटणच्या सौ. दमयंती कुंभार यांनी शिक्षणविषयक क्षेत्रे, स्कॉफ परिशिष्टे १ ते ८ याविषयी माहिती देऊन सखोल असे मार्गदर्शन केले.

शिक्षकांना तीन टप्प्यांमध्ये पाचदिवसीय प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे, असे सौ. दमयंती कुंभार यांनी सांगितले. सुलभक श्री. मिलिंद शिंदे व इतर शिक्षक सहकार्‍यांनी या प्रशिक्षणाचे नियोजन यशस्वीरीत्या पार पडले.

यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम सर यांनी प्रशिक्षणस्थळी भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, नुसते पुस्तकी शिक्षण घेऊन उपयोग नाही. त्याला व्यावसायिक शिक्षणाची जोड देणे गरजेचे आहे. ही काळाची गरज असून त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणासाठी सर्व प्रशिक्षणार्थींची बैठक व्यवस्था, जेवणाची व्यवस्था उत्तम करण्यात आली होती. तसेच या प्रशिक्षणामधून नवनवीन संकल्पना शिकण्यास मिळाल्या. ज्यांचा वापर विद्यार्थी घडवण्यासाठी उपयुक्त आहे, अशा प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थींमधून मिळाल्या.

यावेळी अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण, सातारा डॉ. सतिश फरांदे यांनी फलटण एजुकेशन सोसायटीचे व प्रशासन अधिकारी अरविंद निकम यांचे भौतिक सुविधा उपलब्ध केल्याबद्दल आभार मानले. श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुलामध्ये प्रशिक्षण उत्साहात पार पडले. या प्रशिक्षणासाठी श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री. संजय वेदपाठक, मनोज कदम, उत्तम घोरपडे, योगेश भिसे यांनी सहकार्य केले व प्रशिक्षण खेळीमेळीत पार पडले.


Back to top button
Don`t copy text!