स्थैर्य, सिंधुदुर्गनगरी, दि. २१: तोक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पंचनामे पूर्ण होताच राज्यस्तरावर याबाबत आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत जाहीर केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
तोक्ते चक्रीवादळामुळे मालवण येथे चिवला बीच परिसरात झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी आज पाहणी केली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी उपस्थित होत्या.
तोक्ते चक्रीवादळाची तीव्रता अधिक होती. याचा मोठा फटका किनारपट्टी भागाला बसला आहे. या काळातही शासकीय यंत्रणेने धीरोदात्तपणे काम केले असून त्याबद्दल यंत्रणेस मी धन्यवाद देतो. यामध्ये जनतेचे सहकार्य चांगले मिळाले असल्याचे, मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले.
मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे एक दोन दिवसात पूर्ण होतील. त्यानंतर राज्यस्तरावर आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत जाहीर केली जाईल. तोक्ते चक्रीवादळामुळे ज्या ज्या घटकांचे नुकसान झाले आहे त्यांना मदत दिली जाईल. कोळी बांधव, मच्छीमार व्यावसायिक यांच्यासह कोणताही घटक मदतीपासून वंचित राहणार नाही, असे मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले. या आपत्तीच्या मदतीसाठी केंद्राकडून राज्याला जास्तीत जास्त मदत मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बदलत्या हवामानामुळे समुद्रिय वादळांचा धोका वाढला आहे. भविष्यात वादळामुळे कमीतकमी नुकसान होईल याबाबत उपाययोजना केल्या जातील.
मुख्यमंत्र्यांचा दिलासा
मालवण येथे त्यांनी ज्यांच्या घरांची पडझड झाली त्याविषयी माहिती घेतली व काही ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांना दिलासा दिला.