स्थैर्य, औरंगाबाद, दि.२०: कोव्हीड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे हक्क मिळवून देऊन त्याचे संरक्षण व संगोपण व्हावे यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल गठीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंबंधी शासन निर्णय महिला व बालविकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी या टास्क फोर्सचे अध्यक्ष असून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सदस्य सचिव तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.
सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा वाढलेला संसर्ग बाधित व्यक्तीचे व मृत्यूचे वाढलेले प्रमाण विचारात घेता त्याचा बालकांच्या जिवनावरसुद्धा गंभीर परिणाम होत आहे. त्यातच काही प्रसंगी कोव्हीडमुळे दोन्ही पालकांचे निधन झाल्याने अनाथ झालेल्या बालकांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची तसेच बालकामगार, बालभिक्षेकरी किंवा मुलांची तस्करीसारख्या गुन्हांना बळी पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने देखील टास्क फोर्स गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली या टास्क फोर्समध्ये जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य असून जिल्ह्यातील कोविड-19 मुळे मृत्यू पावलेल्या पालकांच्या बालकांसाठी काळजी व संरक्षणाची गरजेनुसार तात्काळ व तत्परतेने सेवा प्रदान करण्यात येत आहेत. तरी जिल्हाधिकारी औरंगाबाद यांचे अध्यक्षतेखाली स्थापण झालेल्या टास्क फोर्सने सर्वांना आवाहन करण्यात आलेले असून समाज माध्यमाव्दारे दत्तक दिले जाईल किंवा घेतले जाईल असे चुकीचे संदेश पाठवणे व त्यास प्रतिसाद देणे हे कायद्याने गुन्हा असल्याचा इशारा देण्यात आलेला असून कोविड-19 च्या कालावधीत दोन्ही पालकांचा मृत्यू झालेल्या बालकांची कोणालाही माहिती प्राप्त झाली तरी चाईल्ड लाईन – 1098 वर तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, औरंगाबाद अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, औरंगाबाद यांना तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे, असे आवाहन सदस्य सचिव, जिल्हा बाल संरक्षण समिती तथा जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, औरंगाबाद यांनी केले आहे.
चाईल्ड हेल्प लाईन 1098 चा माहितीफलक सर्व रुग्णालयात दर्शनी भागात लावा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
जिल्हयात कोवीड – 19 या आजाराने दोन्ही पालक किंवा एक कमावता पालक गमावलेल्या बालकांना बाल संगोपन योजनेंतर्गत लाभाकरिता कृतीदलाची (टास्क फोर्स) ची स्थापना करण्यात आली असून अशा बालकांच्या मदतीसाठी चाईल्ड हेल्प लाईन नं. 1098 या क्रमांवर संपर्क साधून गरजूंनी या योनजेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी चाईल्ड हेल्प लाईन 1098 या बाबतचा माहितीफलक सर्व रुग्णालयात दर्शनी भागात लावण्यात यावा, असे निर्देशही संबंधित विभागाला दिले.
कोवीड-19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हर्षा देशमुख, बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲड ज्योती पत्की, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर, पोलीस निरीक्षक बी.जी.कोळी, पोलीस निरीक्षक किरण पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.
कोवीड-19 रोगाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकामध्ये कार्यरत असणाऱ्या बालगृहे निरिक्षण गृहाकरिता तात्काळ उपचार पुरविण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्त करुन पथकांतर्गत येथील कर्मचाऱ्यांचे तात्काळ लसीकरण करण्यात यावे अशा सूचना देत श्री. चव्हाण यावेळी म्हणाले की, कोवीड -19 या आजाराकरीता रुग्णालयात दाखल होतेवेळी या कालावधीमध्ये आपल्या बालकाचा ताबा कोणाकडे द्यावा ही माहिती रुग्णाकडून भरुन घेण्याबाबत सर्व रुग्णालयांना निर्देश दिले. तसेच चाईल्ड हेल्प लाईन 1098 याबाबतचा माहिती फलक सर्व रुग्णालयात दर्शनी भागात लावण्यात येईल याची दक्षता घेणे, बालकांना सर्वोतोपरी संरक्षण उपलब्ध करुन देणे व अशी बालके शोषणास बळी पडणार नाहीत किंवा बालकामगार अथवा तस्करी सारख्या गुन्हेगारीमध्ये सापडणार नाहीत याची दक्षता घेणे, दर पंधरा दिवसातून एकदा टास्क फोर्सची बैठक आयोजित करणे, अशा पालकत्व गमावलेल्या बालकांना त्यांचे कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यकतेनुसार न्यायिक सल्ला व इतर सुविधा उपलब्ध करुन देणे. तसेच या बालकांचे आर्थिक व मालमत्ता विषयक हक्क अबाधित राहतील याकरिता दक्षता घेणे, या बालकांच्या दत्तक प्रक्रीयेची आवश्यकता असल्यास प्रचलित CARA मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक कार्यवाही करणे, आवश्यक असलयास बालकासाठी समुदेशनाची व्यवस्था करणे, आदी सूचना यावेळी श्री. चव्हाण यांनी संबंधित सदस्य असणाऱ्या विभागाला दिल्या.
महिला व बाल विकास विभागतंर्गत शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यात कोवीड-19 प्रादुर्भावच्या काळात राज्यातील बालकांची काळाजी संरक्षकाचे काम करणाऱ्या संस्थामधील बालकांना तसेच कोवीड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्यात येत असुन या कृती दलामार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत बालकांच्या (1) ज्या मुलांचे दोन्ही पालक कोवड-19 मुळे मृत्यू पावले आहेत व बालकांची काळजी घेण्यासाठी कोणीही नाही.(2) ज्याचे दोन्ही पालक कोविड-19 मुळे दवाखान्यात भरती आहेत व बालकाला तात्पुरता आश्रय पाहिजे असेल (3) कोविड-19 मुळे बालकाला काळजी व संरक्षणाची कुठलीही गरज भासत असल्यास सेव द चिल्ड्रेन्स- 7400015518/8308992222 अध्यक्ष, बाल कल्याण समिती, औरंगाबाद -9822762157, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, औरंगाबाद-9370003517 या क्रमांक वर संपर्क साधावा.