स्थैर्य, सातारा, दि. 27 : सातारा जिह्यात चारवेळा लॉकडाऊनची घोषणा करुनही करोना बाधितांची संख्या 3 हजारांवर पोहोचली आहे. 106 बाधितांचा बळी गेला आहे. तरीही जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग आणि पोलीस दलाच्या कामकाजातील त्रुटी आढळून आल्या आहेत. सातारा जिल्हा नियोजन भवनातील आढावा बैठकीमध्ये शासकीय रुग्णालयातील गलथान कारभाराबाबत पालकमंत्री व गृहराज्य मंत्र्यांसमोरच सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यथा मांडल्या व अनेक प्रश्न उपस्थित करत प्रशासनाने पारदर्शकता आणावी अशी मागणीही केली.
गेल्या चार महिन्यांपासून सातारा जिह्यात करोना बाधित रुग्णांच्या हालाखीबाबत सातत्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक टाहो फोडत आहेत. एखाद्या व्यक्तीला ताप व थंडी आल्यानंतर त्यावर उपचार करणे सोडाच, परंतू त्याला वाईट वागणूक देऊन त्याचे मानसिक खच्चीकरण होत आहे. यामधून बाधित मृतकांचे नातेवाईकही सुटलेले नाहीत. जावली तालुक्यातील शिंदेवाडीच्या मृताच्या संपर्कात आलेल्या महिला व तिच्या दोन लहान मुलांना जिल्हा शासकीय सर्वसाधारण रुग्णालयात प्रवेशसुद्धा नाकारण्यात आला. अखेर सामाजिक भावनेतून एक महिला कार्यकर्त्या जयश्री शेलार यांनी स्वखर्चाने ऍम्ब्युलन्स उपलब्ध करुन संबंधित महिलेला शिंदेवाडीला सुखरुप पाठवले.
शासकीय रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी, परिचारिका व केरळ येऊन आलेल्या प्रशिक्षित परिचारिका चांगल्या पद्धतीने काम करीत असल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळत आहे. परंतू आरोग्य विभाग व पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तक्रारींची गंभीर दखल घेत नाहीत. याची माहिती करोना बाधित रिपोर्ट इतकीच दाबली जाते, अशी टीका जयहिंद फौंडेशनचे संदीप माने यांनी केली. तर शासकीय रुग्णालयात गरम पाणी, वाफारा मिळत नाही. त्यामुळे अनेक रुग्ण खाजगी रुग्णालयात धाव घेतात, असेही स्पष्ट केले.
जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, पोलीस अधीक्षक, प्रांत, तहसिलदार या अधिकाऱयांना बैठकीमध्ये कोरोनाबाबतची वस्तुस्थिती सांगता येत नाही, हा शासनाचा पराभव आहे. त्यामुळे सातारा जिह्यात कोविड डिफेन्स, सवयभान, जिल्हा कोविड टास्क फोर्स व कष्टकरी दलित वस्तीसाठी कोरोना ब्ल्यू फोर्स कार्यरत झालेल्या आहेत. त्यामुळे सातारकरांना दिलासा मिळत आहे.
सातारा जिह्यातील आढावा बैठकीच्या अनुषंगाने मंत्री महोदय व लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. ही बाब चिंताजनक ठरु लागली आहे. साताऱ्यातील एका दैनिकाचे संपादक व शिक्षण संस्था चालक यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून रायगांव, ता. जावली येथील शिक्षण संस्थेची इमारत विलगीकरण करण्यासाठी दिली होती. आज त्या ठिकाणी करोना बाधित रुग्ण पाठविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे या संस्था चालकाच्या कुटूंबालाही करोना ची बाधा झाली आहे. मात्र, त्यांची साधी विचारपूससुद्धा केलेली नाही.रस्त्यावर चार बांबू आडवे लावून प्रतिबंधित क्षेत्र असा फलक लावला, की प्रशासनाची जबाबदारी संपते, असे मानण्यात येत आहे. ही बाब गंभीर असून आता लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद सदस्यांनीच आवाज उठवावा. कारण कोरोनाच्या नावाने जिह्यात कोटय़वधी रुपये खर्च झाले असले तरी त्याचा प्रत्यक्ष उपयोग किती झाला, याचे ऑडिट होण्याची गरज सातारकरांनी व्यक्त केली.