
स्थैर्य, 8 मार्च, सातारा – राज्यातील पहिला मराठी भाषा पंधरवडा मसाप, शाहुपुरी शाखा आणि सातारा नगरपालिकेच्यावतीने सुरु करण्यात आला. यंदा या मराठी भाषा पंधरवड्याचे 15 वे वर्ष आहे. त्यातंर्गत सोमवार दि.9 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता शाहूकला मंदिर येथे हिंदी मराठी चित्रपट संगीत अभ्यासक विशेषज्ञ, लेखिका डॉ. मुदुला दाढे यांचा ‘….तरी असेल गीत हे’ हा कार्यक्रम होणार आहे.
डॉ. मृदुला दाढे-जोशी या भारतीय चित्रपट संगीतावरील संशोधनासाठी प्रसिध्द आहेत. त्या ख्यातनाम गायिका, संगीत अभ्यासक आणि लेखिका आहेत. त्या एक अष्टपैलू कलाकार असून त्यांनी शास्त्रीय संगीताच्या पायावर चित्रपट संगीताचा रसास्वाद घेण्याची एक वेगळी परंपरा निर्माण केली आहे. स्त्वरांकन , अक्षय गाणी,सरींवर सरी (विनायक जोशी) ओंकार स्त्वरूपा (सुरेश वाडकर, श्रीधर फडके ) हे त्यांचे गाजलेले कार्यक्रम आहेत. श्रोत्यांची प्रामुख्याने ’चित्रपट संगीतविषयक जाण वाढवणे’ ही एक चळवळ त्या चालवतात. त्याला अनुसरूनच मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त ’….तरी असेल गीत हे ! हा कार्यक्रम त्या सातारकरांसमोर सादर करणार आहेत.
यावेळी डॉ.दाढे या नामवंत संगीतकार श्रीनिवास खळे, सुधीर फडके, पंडित ह्दयनाथ मंगेशकर, अशोक पत्की यांच्या रचना उलगडून दाखवणारे सप्रयोग व्याख्यान त्या देणार आहेत. या कार्यक्रमास खा.श्री.छ. उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा पालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ड.डी.जी. बनकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर सातारा नगरपालिकेचे गटनेता अविनाश कदम, नगरसेवक मनोज शेंडे, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे. या अनोख्या कार्यक्रमास सातारकर रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मसाप, शाहूपुरी शाखाचे अध्यक्ष नंदकुमार सावंत आणि सातारा नगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

