शेतकऱ्यांची प्रतिष्ठा वाढण्याच्या, शेतकरी चिंतामुक्त होण्याच्या अन् शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीकोनातून कृषी विभाग कार्य करणार – कृषीमंत्री दादाजी भुसे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०६ एप्रिल २०२२ । मुंबई । शेतकऱ्यांची प्रतिष्ठा वाढली पाहिजे, शेतकऱ्यांची सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे, आपला शेतकरी चिंतामुक्त झाला पाहिजे, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्हिजन आहे, त्या दृष्टीकोनातून कृषी विभाग कार्य करणार असल्याचे प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज कर्जत-नेरळ येथे केले.

कृषी विभागाचे विविध उपक्रम व नियोजन दिशा याकरिता कृषी मंत्री श्री.दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नेरळ येथील सगुणा बाग येथे आज बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि जिल्हा व तालुका कृषी अधिकारी हे उपस्थित होते.

या बैठकीत महाराष्ट्रात खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून केली जाणारी पूर्वतयारी याबाबत काही निर्णय घेण्यात आले तसेच खरीप हंगामासाठी लागणारी खते व बियाणे पुरेशा प्रमाणात आहेत का? शिवाय शेतकरी बांधवांनी कमी लागवड खर्चात जास्तीत जास्त दर्जेदार शेतमालाची निर्मिती कशी करता येईल व शेतकऱ्यांच्या शेतावर बियाणे उपलब्ध कसे करता येवू शकते, यानुषंगाने कृषी विभागाकडून आढावा बैठकीदरम्यान घेण्यात आला. शेतीसंबंधीच्या आधुनिक तंत्रज्ञानावरदेखील चर्चा करीत शेतकऱ्याच्या पिकाबाबत समस्या सोडविण्यासाठीदेखील या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. यावेळी कृषी विभाग अधिकारी यांनी देखील आपली मते मांडली.

प्रगतशील व नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी ओळखले जाणारे शेतकरी कृषीभूषण श्री.शेखर भडसावळे यांच्या सगुणा बागेस भेट देत कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी तेथील नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी केली आणि श्री.भडसावळे यांचे त्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबत त्यांचे कौतुक केले. या भेटीदरम्यान श्री.शेखर भडसावळे यांनी शेतात लागवड केलेल्या पिकांची व त्याला आवश्यक असणारी जमीन, SRT या पद्धतीच्या वापरातून येथील शेतातच तयार करण्यात आलेल्या नैसर्गिक व रासायनिक खताबाबत, पिकविलेल्या पालेभाज्या व कडधान्ये, पिकांच्या गुणवत्तेबाबतची माहिती यावेळी कृषी मंत्री श्री.भुसे यांना दिली.


Back to top button
Don`t copy text!