स्थैर्य, फलटण : फेब्रुवारी महीन्यात डॉ. अनिल कदम यांची बदली रद्द होणेसाठी समस्थ ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीस विशेष ग्रामसभा घेणेस भाग पाडले. त्यात सर्वानुमते डॉ. कदम यांची बदली रद्द करून प्राथमिक आरोग्य केंद्र तरडगांव येथे नियूक्ती करणेत यावी असा ठराव सर्वानुमते संमत करणेत आला. यावेळी डॉक्टरांची बदली रद्द व्हावी यासाठी तरडगांवसह परिसरातील असंख्य महीला व पुरुषांनी ग्रामसभेला तोबा गर्दी केली होती. तद्नंतर सर्वपक्षीय नेत्यांनी याबाबत सतत सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना लेखी पत्र देऊन, फोनव्दारे, स्वतः भेटी घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. सदरची बदली रद्द व्हावी म्हणून माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीही डॉ. अनिल कदम यांची तरडगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती पुन्हा द्यावी असा आग्रह सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या जवळ धरला. तरडगाव ग्रामस्थांच्या मागणीचा मान ठेवत डॉ. कदम यांच्या कामाची दखल घेऊन प्रशासनाने त्यांची पुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्र तरडगांव येथे नियुक्ती केली. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रभारी वैद्यकिय अधिकाऱ्याचा चार्ज सोमवार दि. २२ जून २०२० रोजी डॉ. अभय कांबळे यांचेकडुन डॉ. अनिल कदम यांनी घेतला. दि. २५ जानेवारी २०२० रोजी डॉ. अनिल कदम यांची गिरवी ता. फलटण येथे प्रतिनियूक्तीवर बदली करणेत आलेली होती. तद्नंतर समस्थ तरडगांव ग्रामस्थांनी या बदलीस कडाडुन विरोध केला होता.