
फलटण तालुक्यातील तरडगाव येथे राजे गटाला मोठा धक्का. १५ वर्षांच्या विकासाच्या अनुशेषावरून नाराज होत शेकडो तरुणांचा भाजपमध्ये प्रवेश. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न. वाचा सविस्तर…
स्थैर्य, फलटण, दि. ०२ फेब्रुवारी : फलटण तालुक्यातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असून, माजी आमदार दीपकराव चव्हाण यांचे गाव असलेल्या तरडगाव (Taradgaon) येथेच राजे गटाला (Raje Group) मोठे खिंडार पडले आहे. गावातील विकासाचा प्रश्न आणि १५ वर्षांची नाराजी व्यक्त करत शेकडो प्रमुख युवा कार्यकर्त्यांनी आज राजे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करत भारतीय जनता पार्टीत (BJP) जाहीर प्रवेश केला.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम आणि स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य प्रवेश सोहळा पार पडला.
भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रमुख कार्यकर्ते: यावेळी तरडगाव येथील प्रमुख युवा कार्यकर्ते अविनाश गायकवाड, अभिषेक गायकवाड, आशिष गायकवाड, महेश गायकवाड, अक्षय गायकवाड, सागर गायकवाड, आदित्य गायकवाड, ओमकार गायकवाड, संकेत गायकवाड, संदीप गायकवाड. तसेच प्रदीप मदने, विकास मदने, सोमनाथ मदने, अमोल मदने, शंभू मदने, गौरव जाधव, सौरभ जाधव, अक्षय मदने, अनिकेत माने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.
“१५ वर्षे आमदारकी असूनही गाव विकासापासून वंचित”
यावेळी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “आमच्या तरडगावला सलग १५ वर्षे आमदारकीचे मोठे पद मिळाले. मात्र, या पदाचा आणि सत्तेचा उपयोग गावाच्या सर्वांगीण विकासासाठी झाला नाही. गेल्या १५ वर्षांत गावाचा विकास रखडला असून, सत्तेचा फायदा केवळ ठराविक लोकांनाच झाला. सामान्य जनता आणि कार्यकर्ते मात्र विकासापासून वंचित राहिले.” याच नाराजीतून आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.
दीपक चव्हाणांना धक्का
तरडगाव हे माजी आमदार दीपक चव्हाण यांचे गाव असल्याने या प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर ‘होम पिच’वरच कार्यकर्त्यांनी साथ सोडल्याने राजे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सर्व नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले आणि तरडगावच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
