
दैनिक स्थैर्य । दि. १९ ऑक्टोबर २०२२ । सातारा । येथील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या विद्यार्थी वसतिगृहात १९६५ पासून ते २०१८ पर्यंत विद्यार्थ्यांना स्वयंपाक करून घालणाऱ्या तारामावशी [ताराबाई मुगुटराव तावरे ] मु.पो .तारगाव तालुका -कोरेगाव यांचे मंगळवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ५ .३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ८७ वर्षाचे होते. छत्रपती शिवाजी कॉलेजचे विद्यार्थी वसतिगृह ज्या ठिकाणी आज जुनी इमारत पाडून आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मिडीअंम स्कूल बांधण्यात आले आहे,तिथल्या वसतिगृहात त्यांनी आयुष्यातील ५३ वर्षे स्वयंपाक करून वसतिगृहातील मुलांना जेवू घातले. भाकरी , कालवण इत्यादी खाऊन वसतिगृहातील अनेक मुले बाहेर पडली. वसतिगृहात राहणाऱ्या कमवा आणि शिका योजनेत शिकणाऱ्या अनेक मुलांच्या डोळ्यात आज पाणी उभे राहिले. अलीकडेच विद्यार्थ्यांनी त्यांना कमवा आणि शिका योजनेच्या बागेत बोलावून आणून त्यांना मानपत्र देऊन सत्कार केला होता.छत्रपती शिवाजी कॉलेजच्या वार्षिक नियतकलिक शिवविजय २०२१-२२ मध्ये याच वर्षी त्यांना मानपत्र दिल्याचा समारंभाचा कव्हर पेजवर फोटो घेऊन माहिती देण्यात आली होती.पूर्वी छत्रपती शिवाजी कॉलेजच्या वसतिगृहात. तारा मावशी ,लीला मावशी,सावंत मावशी,छाया मावशी,जयश्री मावशी ,कमल मावशी,अशा मावशीनी काम केले. पूर्वी विद्यार्थी ६ -६ महिने गावाकडे जात नसत.तेव्हा वसतिगृहात विद्यार्थ्यांना आईचे प्रेम या मावशीनी दिले.विनम्रता हा त्यांचा गुण होता.विद्यार्थ्यांची सुखदुःखे त्या समजून घेत असत. दुखद घटना अशी की त्यांचा एकुलता मुलगा साहेबराव मुगुटराव तावरे यांचे याच महिन्यात ८ तारखेस हृदय विकाराने निधन झाले. आता त्यांच्या पश्चात सून नंदा, नातू मनोज व त्याची पत्नी नयना ,पणतू कृष्णा,चिन्मयी हे आहेत .ही वार्ता समजल्यानंतर . छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर तसेच प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर सेवक यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. मंगळवारी दुपारी ११.३० वाजता माहुली येथे तारामावशी यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी नगरसेवक अण्णासाहेब मोरे पाटील,गोडोलीतील ग्रामस्थ,वसतिगृहात राहून शिकलेले त्या वेळचे विद्यार्थी फिरोज मेटकरी,दशरथ रणदिवे ,बाळासाहेब वाघ, आर.पी.भोसले ,पोपट गडदे, डॉ.सादिक तांबोळी इत्यादी अनेक विद्यार्थी उपस्थित होते.गुरुवार दिनांक २० ऑक्टोबर सकाळी ९ वाजता कैलास स्मशानभूमी येथे रक्षा विसर्जन विधी होणार आहे.