स्थैर्य, बंगळुरु, दि. ०३: अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर नुकतीच रिलीज झालेली वेब सीरिज ‘तांडव’वर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात येत आहे. आता या वेब सीरिजमुळे प्रेक्षकांच्या भावना दुखावल्याबद्दल अॅमेझॉन प्राइमने माफी मागितली आहे. अॅमेझॉनने या बाबतचे अधिकृत निवेदन जारी केले आहे. मुंबई, लखनौसह देशातील विविध भागांत या वेब सीरिजचे निर्माते, दिग्दर्शक, लेखकांविरोधात तक्रारी दाखल आहेत. मुंबईतील घाटकोपर पोलिस स्टेशनमध्ये IPC कलम 153 (A) 295 (A) 505 अंतर्गत FIR दाखल आहे.
अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने माफीनाम्यात काय म्हटले?
अॅमेझॉनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्ही प्रदर्शित केलेल्या तांडव या वेब सीरिजमध्ये काही दृश्य प्रेक्षकांना आक्षेपार्ह वाटली. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नव्हता.
आम्ही प्रेक्षकांच्या भावनांचा सन्मान करतो. आता ती आक्षेपार्ह दृश्य वगळण्यात आली आहे.’
अपर्णा पुरोहित यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता
अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या कंटेंट हेड अपर्णा पुरोहित यांचा इलाहाबाद उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला होता. अटकपूर्व जामीन किंवा गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात जावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. आम्ही कलम 482 CrPC अंतर्गत दिलेल्या अधिकाराचा वापर करु शकत नाही. त्यामुळे आम्ही अंतरिम संरक्षण बहाल करु शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले होते.
काय आहे वाद?
अली अब्बास जफर हे तांडवचे दिग्दर्शक आहेत. सैफ अली खान, डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर यांच्या या सीरीजमध्ये प्रमुख भूमिका आहेत. राजकारणावर आधारित या सीरिजमध्ये एका कॉलेजच्या गँदरिंगमध्ये नाटकात देवदेवतांच्या संवादाचं दृश्य आहे. एका दृश्यात ‘नारायण-नारायण. देवा काहीतरी कर. रामजींचे अनुयायी सोशल मीडियावर सतत वाढत आहे’, अशा आशयाचा एक संवाद आहे. या संवादासोबातच, इतर बरेच संवाद देखील वादात अडकले आहेत. हा वाद इतका वाढला की, माहिती व प्रसारण मंत्रालयालाही या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला होता.
वादावर निर्मात्याने काय म्हटले होते?
वाढता वाद बघता निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वी एक निवेदन जारी केले होते. ‘ही वेब सीरिज पूर्णपणे फिक्शन आहे. या सीरिजमधील घटनेचा कोणत्याही जिवित व्यक्ती वा एखाद्या घटनेशी संबंध नाही. असलास तर तो योगायोग समजावा. कोणत्याही व्यक्ती, जाती, समुदाय आणि धार्मिक भावनांना ठेच पोहोचवण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही सर्व तक्रारी समजून घेतल्या असून कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही सर्वांची विना अट माफी मागत आहोत,’ असे अली अब्बासॆ जफर यांनी म्हटले होते.