संगमनेरमधील तमाशा कलावंतांवरील भ्याड हल्ल्याचा साताऱ्यात तीव्र निषेध; संरक्षण देण्याची ‘विद्रोही’ची मागणी


 संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार येथे तमाशा कलावंतांवर आणि विशेषतः महिलांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा विद्रोही सांस्कृतिक चळवळीने तीव्र निषेध केला असून, लोककलावंतांना तातडीने संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

स्थैर्य, सातारा : संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार येथे तमाशा कलाकार आणि विशेषतः महिला कलावंतांवर गावगुंडांनी भ्याड हल्ला करून मुलींची छेड काढल्याचा संतापजनक प्रकार नुकताच घडला आहे. या घटनेचा ‘विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र’च्या वतीने साताऱ्यात तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून, हल्ला करणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा मंडळावर हल्ला

सुप्रसिद्ध लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा मंडळावर हा हल्ला झाला आहे. या संदर्भात विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राष्ट्रीय मुख्य समन्वयक डॉ. भारत पाटणकर, अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव, सरचिटणीस डॉ. जालिंदर घिगे, उपाध्यक्ष प्रा. गौतम काटकर आणि प्रवक्ते कॉ. अविनाश कदम व कॉ. विजय मांडके यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

संरक्षण द्या, अन्यथा लोकसंस्कृती धोक्यात

अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, केवळ गुन्हा दाखल करून हा प्रश्न सुटणार नाही. शासनाने तमाशा फडमालकांना आणि कलाकारांना ठोस पद्धतीने संरक्षण द्यावे, अशी आग्रही मागणी कॉ. विजय मांडके व कॉ. अविनाश कदम यांनी केली आहे.

लोककलावंत सुरक्षित असतील तरच कला टिकेल आणि कला टिकली तरच आपली अस्सल लोकसंस्कृती जिवंत राहील, असा महत्त्वाचा मुद्दा ‘विद्रोही’ने या निवेदनातून मांडला आहे.

“गावोगावी सध्या जत्रांचा हंगाम सुरू आहे. तमाशाचे फडमालक आणि कलाकार आपली कला सादर करून कुटुंबाच्या उपजीविकेसाठी दोन पैसे कमवतात. अशा वेळी त्यांना सन्मानाने जगता येत नाही, त्यांचा अपमानच जास्त होतो. तमाशा फडातील मुली व पुरुषांवर झालेला हा भ्याड हल्ला माणुसकीला काळीमा फासणारा तर आहेच, पण समाजकंटक कुठल्या थराला जातात याचाच हा नमुना आहे.”डॉ. भारत पाटणकर


Back to top button
Don`t copy text!