दैनिक स्थैर्य । दि. १५ मार्च २०२२ । फलटण । गावाच्या सर्वांगिण विकासासाठी ग्रामपंचायतीचे कायदेशीर कामकाज समजून घेतले पाहिजे. सरपंच, सदस्यांनी डोक्यातून राजकारण काढून टाका आणि आपली जबाबदारी, कर्तव्य, कामे माहिती करून घ्या.भविष्याचा वेध घेऊन लोकसहभागातून गावाच्या सर्वांगिण विकासासाठीची उपयुक्त कामांचे नियोजन करा. त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक सदस्यांनी सर्वोत्तम योगदान देऊन गावाबरोबर फलटण तालुक्यातील एकातरी ग्रामपंचायतीने कोणत्याही उपक्रम, योजनेत सहभागी होऊन राज्य आणि केंद्रीय स्तरावरील पुरस्कार मिळवून गावाबरोबर तालुक्याचा लौकिक वाढवा,” असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत “संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभिमान अंतर्गत सातारा जिल्हा परिषद, फलटण पंचायत समिती आणि रयत शिक्षण संस्थेचे वर्ये येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्र यांनी संयुक्तपणे नवनिर्वाचित ग्रामपंचायतीचे सदस्यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा फलटण येथील श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या महाविद्यालय आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद् घाटन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, विस्तार अधिकारी महादेव चौधरी, पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय जाधव, प्रविण प्रशिक्षक सुरेंद्र चव्हाण, धनाजी पाटील , अमोल जाधव, विद्याधर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामपंचायत कायदा, सभा कामकाज, लेखा संहिता, नमुने १ ते ३३, अधिनियमातील ठळक तरतुदी, जल व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, शाश्वत विकास, ई पंचायत, पंचायत काल आज उद्या अशा विविध विषयांवर प्रविण प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.
फलटण तालुक्यातील १८ गावातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.