राजे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्याकडे तालुक्याचे लक्ष; बॅनरवर कोणत्याच नेत्याचा फोटो नाही


स्थैर्य, फलटण, दि. १९ ऑक्टोबर : आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, विधानपरिषदेचे माजी सभापती आणि आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज दुपारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे. कोळकी येथील अनंत मंगल कार्यालयात दुपारी २ वाजता होणाऱ्या या मेळाव्याकडे संपूर्ण तालुक्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राजे गटाच्या मागील काही निवडणुकांमधील धक्कादायक भूमिकांमुळे, या मेळाव्यातून श्रीमंत रामराजे कोणती राजकीय दिशा स्पष्ट करणार, याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य असले तरी, गेल्या काही काळापासून त्यांचा तालुका आणि जिल्हास्तरीय पक्षीय कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग दिसलेला नाही. विशेष म्हणजे, आज होत असलेल्या मेळाव्याच्या सोशल मीडियावरील प्रसिद्धीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाचा उल्लेख टाळण्यात आला आहे. ‘आयोजक: राजे गट’ असा स्पष्ट उल्लेख असल्याने, राजे गट आपली स्वतंत्र राजकीय भूमिका घेणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे.

राजे गटाच्या राजकारणात अशा कार्यकर्ता मेळाव्यांना महत्त्व आहे. गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या मेळाव्यानंतर राजे गटाने दृश्य-अदृश्य स्वरूपात धैर्यशील मोहिते-पाटील यांना मदत केल्याचे मानले जाते, जे त्यांच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या मेळाव्यानंतरही नाट्यमय घडामोडी घडल्या. अजित पवारांनी जाहीर केलेली उमेदवारी नाकारून, राजे गटाचे नेते दिपक चव्हाण यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. या दोन्ही घटनांमुळे राजे गटाच्या भूमिकेबद्दल नेहमीच एक गूढता राहिली आहे.

आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना हा मेळावा होत आहे. त्यामुळे हा मेळावा केवळ कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यापुरता मर्यादित न राहता, यातून आगामी काळातील मोठ्या राजकीय निर्णयांचे आणि समीकरणांचे संकेत मिळण्याची दाट शक्यता आहे.

मेळाव्यातून राजे गट नेमकी काय घोषणा करणार? ते राष्ट्रवादी काँग्रेससोबतच राहणार की स्वबळावर निवडणुकांना सामोरे जाणार? किंवा एखाद्या नव्या राजकीय आघाडीला जन्म देणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या मेळाव्यात मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मेळाव्यात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर काय बोलतात, यावरच फलटणच्या आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.


Back to top button
Don`t copy text!