फलटणमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १७ डिसेंबर २०२४ | फलटण | सातारा जिल्हा परिषद, फलटण पंचायत समिती शिक्षण विभाग आणि सद्गुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्था संचलित सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त सहभागाने ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२४ – २५ बुधवार दि. १८ ते शुक्रवार दि. २० डिसेंबर दरम्यान सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, फलटण येथे आयोजित करण्यात येत असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी अनिल संकपाळ यांनी दिली आहे.

या विज्ञान प्रदर्शनात ईयत्ता ६ वी ते ८ वी उच्च प्राथमिक स्तर, ईयत्ता ९ वी ते १२ वी माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन खालील विषयावरील एक विज्ञान संच सादर करावयाचा आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थ्याना तंत्रज्ञान आणि खेळण्यामधील नवकल्पनांचा समावेश असलेली प्रदर्शनीय वस्तू विकसित करण्याचे स्वातंत्र्य असल्याचे गटशिक्षणाधिकारी अनिल संकपाळ यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

अन्न आरोग्य आणि स्वच्छता, वाहतूक आणि दळण वळण, नैसर्गिक शेती, आपत्ती व्यवस्थापन, गणितीय मॉडलिंग आणि संगणकीय विचार, कचरा व्यवस्थापन, संसाधन व्यवस्थापन यापैकी एका विषयावरील प्रदर्शनीय वस्तू, प्रतिकृती, वैज्ञानिक प्रकल्प तयार करुन या विज्ञान प्रदर्शनात सादर करणे अपेक्षित आहे.

विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवार दि. १८ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभ पूर्वक करण्यात येणार असून सद्गुरु व महाराजा संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, सद्गुरु हरीबुवा महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुषारभई गांधी, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (योजना) अनिल नायकवडी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर, गटविकास अधिकारी सतीश कुंभार हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

विज्ञान प्रदर्शन समारोप व बक्षीस वितरण शुक्रवार दि. २० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता आ. सचिन पाटील यांच्या हस्ते समारंभ पूर्वक करण्यात येणार असून सद्गुरु हारीबुवा महाराज शिक्षण संस्थेच्या सचिव आणि स्वयंसिद्धा महिला संस्था समूहाच्या संस्थापक अध्यक्षा ॲड. सौ. मधुबाला भोसले समारंभाचे अध्यक्षस्थान स्वीकारणार आहेत. यावेळी शिक्षणाधिकरी (माध्यमिक)
सौ. प्रभावती कोळेकर, फलटण नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल मोरे, उप शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तेजस गंबरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सदर विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी सर्वांना खुले राहणार असल्याने फलटण शहर व तालुक्यातील विज्ञान प्रेमींनी भेट देवून पाहणी करावी अशी अपेक्षा गटशिक्षणाधिकारी अनिल संकपाळ यांनी व्यक्त केली आहे.


Back to top button
Don`t copy text!