दैनिक स्थैर्य । दि. १८ मे २०२२ । फलटण । शहराच्या सभोवती रहिवास क्षेत्र आणि शहरापासून दूर अंतरावर आळंदी – पंढरपूर – मोहोळ राष्ट्रीय महामार्गावर औद्योगिक वसाहत असे योग्य नियोजन केल्याचा फायदा आज तालुक्याला होत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
बिल्डर्स असोसिएशन फलटण शाखा नवनिर्वाचित पदाधिकारी पदग्रहण समारंभात विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. याप्रसंगी असोसिएशनचे राज्य चेअरमन दत्तात्रय मुळे, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, उपळेकर देवस्थान ट्रस्टच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, बिल्डर्स असोसिएशन महाराष्ट्राचे माजी चेअरमन रणधीर भोईटे, प्रमोद निंबाळकर, बिल्डर्स असोसिएशनचे पदाधिकारी व सर्व सदस्य, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, फलटण दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार, सातारा, सोलापूर, बारामती येथील असोसिएशनचे पदाधिकारी, लायन्स क्लब, वकील संघ, फलटण एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी आणि फलटणकर उपस्थित होते.
३० वर्षांपूर्वी नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक औद्योगिक वसाहतीच्या प्रश्नावर होत होती, तत्कालीन नेतृत्वामध्ये औद्योगिक वसाहत कोणत्या दिशेला व्हावी या विषयावर अनेक काळ राजकारण होत राहीले, मात्र त्यांना त्याबाबत ठोस निर्णय घेता आला नाही, आपण सत्तेत येताच औद्योगिक वसाहतीच्या जागेबाबत निर्णय घेऊन महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जागा ताब्यात घेऊन विकसीत झाल्यानंतर तेथे कमिन्स सारखी आंतरराष्ट्रीय कंपनी आणून उत्पादन सुरु झाल्याने आज शेकडो तरुणांना रोजगाराची संधी, छोट्या व्यावसायीकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
गेल्या २५/३० वर्षात आपण सर्व मुलभूत प्रश्नांच्या सोडवणूकीला प्राधान्य देवून ते सोडविले असून, उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने येथे येणारे कुटुंबांना नागरी सुविधा देण्यात येथील स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम केल्या आहेत, आता भौतिक सुविधा देण्याची जबाबदारी बांधकाम व्यवसायीकांनी घेतली पाहिजे, आकर्षक बांधकामे केली पाहिजेत, असे सांगून रणधीर भोईटे यांच्या रुपाने आपण राज्याचे नेतृत्व केले हे अभिमानास्पद असल्याचे नमूद करीत राजीव नाईक निंबाळकर हे अनुभवी असून बिल्डर्स असोसिएशनला नवीन उंची देतील असा विश्वास श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
आमच्या समोर लहानाची मोठी झालेल्या बांधकाम व्यावसायिकांनी प्राप्त केलेले कौशल्य, मिळविलेले यश पाहिल्यानंतर त्यांचा अभिमान वाटत असल्याचे नमूद करीत शहराच्या सुनियोजनासाठी अभियंत्यानी नगर परिषदेमध्ये प्रतिनिधीत्व करावे अशी अपेक्षा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
राज्यातील सेंटरपैकी फलटण हे स्वत:चे ट्रेनिंग सेंटर असणारे दुसरे सेंटर असून याचा लाभ कामगार व विद्यार्थी यांना होणार असल्याचे राज्य चेअरमन दत्तात्रय मुळे यांनी नमूद करीत फलटण सेंटरच्या कामाचे तोंडभरुन कौतुक केले. प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर रणधीर भोईटे यांनी प्रास्ताविकात देशपातळीवर राज्याचे नेतृत्व अभिमानाने करताना कुठेही कमी पडलो नाही. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सभापती पदाचा उपयोग करुन बांधकाम व्यवसायीकांचे प्रश्नासाठी मंत्री, सचीव यांच्या बैठकी लावून घेतल्याचे निदर्शनास आणून देत फलटण येथे छोट्या उद्योगासाठी आणखी एक औद्योगिक वसाहत व शहर वाढीसाठी बाहेरुन आणखी एक रिंग रोडची आवश्यकता असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. कोरोना मुळे शहरी भागातून परतीच्या स्थलांतरामुळे फलटणला परवडणाऱ्या घरांची मागणी वाढली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
बिल्डर्स असोसिएशन फलटण सेंटर चेअरमन राजीव नाईक निंबाळकर, व्हा. चेअरमन सुनीलशेठ सस्ते, सचीव महेश साळुंखे, खजिनदार सचीन निंबाळकर, सहसचिव विनोद धायगुडे यांनी पदग्रहण केले. त्यांचे उपस्थितांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
मावळते चेअरमन शफिक मोदी यांनी वर्षभरातील कामाचा आढावा घेतला. नुतन चेअरमन राजीव नाईक निंबाळकर यांनी अनेक कार्यक्रम जाहीर करुन शहर व पर्यावरण यावर बिल्डर्स असोसिएशन चांगले काम करणार असल्याचे सांगितले.
सुनीलशेठ सस्ते यांनी आभार मानले.