फलटणमध्ये सुरु होणार DMart ?; बांधकाम सुरु झाल्याच्या चर्चा!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 10 एप्रिल 2025। फलटण । प्रसन्न रुद्रभटे । फलटण – पुणे रोडवर वडजल गावच्या हद्दीमध्ये DMart हा सुपरमॉल सुरु होत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून फलटण शहरासह तालुक्यामध्ये रंगू लागल्या आहेत. यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना मोठा फटका बसू शकतो परंतु सर्वसामान्य मध्यमवर्गीय जनतेला याचा फायदा होईल, असे मत सुद्धा व्यक्त केले जात आहे.

याबाबत दैनिक “स्थैर्य”ने अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, फलटण तालुक्यातील वडजल ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये आळंदी ते पंढरपूर या हायवे टच तब्ब्ल ३ एकराच्या जागेत DMart होणार असल्याची प्राथामिक माहिती समोर येत आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा म्हणजेच तब्ब्ल २५ हजार चौ.मी.चे बांधकाम असल्याच्या सुद्धा चर्चा सुरु आहेत. याबाबत अद्याप DMart कडून अधिकृत कोणतीही माहिती समोर आली नसली तरी वडजल येथे DMart चे बांधकाम सुरु झाले असल्याची सुद्धा चर्चा सुरु झाली आहे.

याबाबत दैनिक “स्थैर्य”ने वडजल ग्रामपंचातीशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि, “अद्याप कोणत्याही अर्थात बांधकाम, व्यावसायिक अथवा इतर परवानगीसाठी कोणताही अर्ज ग्रामपंचायत प्रशासनाकडे प्राप्त झाला नाही.”

DMart साठी “फलटण” मध्यवर्ती ठिकाण ….

फलटण येथे DMart सुरु करण्याचे मूळ कारण असू शकते कि, जागेची उपलब्धता, उत्तम कनेक्टिव्हीटी (आळंदी – पंढरपूर महामार्ग), फलटण, बारामती, माळशिरस, खंडाळा, कोरेगाव व माण तालुक्यासाठी मध्यवर्ती ठिकाण हे फलटण म्हणून ओळखले जाते. त्यामुळे जर फलटण येथे DMart सुरु होणार असेल तर ते फक्त फलटण तालुक्याचा विचार करून नाही तर फलटण, बारामती, माळशिरस, खंडाळा, कोरेगाव व माण या ६ तालुक्यांमधील ग्राहकांचा विचार करूनच सुरु होत असणार, असे सुद्धा बोलले जात आहे.

DMart मुळे छोट्या व्यापारांना फटका ?

फलटण येथे DMart सुरु झाल्यानंतर फलटण तालुक्यासह इतर शेजारच्या तालुक्यामधील छोट्या व्यापारांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत गेल्या काही दिवसांपूर्वी फलटण येथे छोट्या व्यापारांची बैठक सुद्धा फलटण येथे संपन्न झाली होती. त्यामध्ये सर्व राजकीय गट, तट बाजूला सारून व्यापारी एकत्रित येऊन DMart ला विरोध केला होता.

यामधील काही व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर स्पष्ट केले कि, “फलटण तालुक्यात कोरोना कालावधी नंतर छोटे व्यावसायिक झोपले आहेत. कित्येक व्यवसाय बंद सुद्धा झाले आहेत. तर कित्येक व्यवसाय हे व्हेंटिलेटरवर आहेत. अशामध्ये फलटण येथे जर DMart सुरु झाले तर नक्कीच फलटण तालुक्यातील बहुतांश व्यवसाय हे बंद होतील. व व्यावसायिकांना सुद्धा पुणे, मुंबई येथे नोकरी करायला जावे लागेल. जर हाताला काम देणारेच कमी झाले तर तालुक्यात बेरोजरीचे प्रमाण सुद्धा वाढेल”

येणाऱ्या काळामध्ये फलटण येथे DMart होऊ नये म्हणून व्यापारी तीव्र संघर्ष करण्याच्या मानसिकतेत असल्याचे सुद्धा कळत आहे.


Back to top button
Don`t copy text!