दैनिक स्थैर्य | दि. २४ जानेवारी २०२५ | फलटण |
“हिंसा, घृणा आणि असंवेदनशिलता या प्रवृत्तींचा प्रचंड उदय आज होत आहे. समाजमाध्यमांमध्ये एकमेकांवर आग बरसवणार्या ट्रोलर्सच्या झुंडी तयार झाल्या आहेत. सगळ्याच बाबतीतली विषमता प्रचंड टोकाला गेली आहे. ज्याप्रमाणे देश स्वातंत्र्य होताना तेव्हाच्या परिवर्तनाच्या काळात आशादायी चित्र लोकांच्यासमोर उभं करण्याचं काम साहित्यिकांनी केलं; त्याप्रमाणे लेखक, कवी, प्रतिभावंतांना आपल्या शब्दांचं सामर्थ्य वाढवून समाजाला योग्य दिशा देण्याचं काम आता करावं लागणार आहे”, असे विचार ज्येष्ठ विचारवंत तथा शिवम प्रतिष्ठानचे अध्यक्ष इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केले.
येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, श्री सद्गुरु प्रतिष्ठान व श्रीराम एज्युकेशन सोसायटी यांच्या सहकार्याने श्री सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे शिल्पकार तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित १२ व्या यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरुन इंद्रजित देशमुख बोलत होते. व्यासपीठावर सुप्रसिद्ध वक्ते प्रा. मिलिंद जोशी, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य विनोद कुलकर्णी, बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे, संमेलन स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले, कार्याध्यक्ष डॉ.सचिन सूर्यवंशी (बेडके), म.सा.प.फलटण शाखा अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, सातारा जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
विशाल आणि व्यापक हृदयाचे लोक एकत्र आल्याशिवाय भेद संपणार नाही
“आज सगळ्याच बाबतीतली विषमता प्रचंड टोकाला गेली आहे. पुढच्या पिढीला शांत आणि प्रसन्न करुन योग्य दिशेला घेवून जाण्याची जबाबदारी लेखकांना घ्यावी लागणार आहे. मानवतेचं जग निर्माण करण्यासाठी शब्दांची नवीन बांधिलकी स्विकारुन त्याच्यामध्ये प्रेम, जिव्हाळा, वात्सल्य, संवेदनशीलता देणार्या शब्दांचं भांडार घेवून लोकांच्या हृदयात उतरावं लागेल. बुद्धी माणसामध्ये विषमतेचं बीज रोवते पण हृदय माणसाला एकत्र आणते. विशाल आणि व्यापक हृदयाची लोक एकत्र आल्यशिवाय हे भेद संपणार नाहीत”, असेही इंद्रजित देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.
यशवंतराव चव्हाणांची नैतिकता सर्व क्षेत्रात यावी
“यशवंतराव चव्हाणांच चरित्र येणार्या नेत्यांपुढं ठेवलं पाहिजे आणि ते चरित्र अंमलात आणणारा नेता पाहिजे. नितीमान, चारित्र्यवान, मोठ्या दूरदृष्टीचा नेता आता येवू शकतो कां? याचा विचार आपण सर्वांनी करण्याची गरज आहे. राजकारणाला आपण अनैतिक क्षेत्र मानतो मात्र यशवंतरावांनी त्यात प्रचंड नैतिकता जपली. यशवंतराव चव्हाणांची ती नैतिकता राजकीय क्षेत्रापासून सर्व क्षेत्रात यावी”, अशी अपेक्षाही इंद्रजित देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.
फलटणच्या साहित्य संमेलनाचे सातत्य आणि वैविध्य दुर्मिळ : प्रा.मिलिंद जोशी
प्रा.मिलिंद जोशी म्हणाले, “यशवंतराव चव्हाणांनी सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणाचा पाया घातला. सुधारणांचा रथ कितीही वेगाने धावला तरी त्याचे सारथ्य संस्कृतीने केले पाहिजे याचा आग्रह त्यांनी धरला. आज त्यांनी प्रस्थापित केेलेल्या राजकीय परंपरेपासून महाराष्ट्र दूर जात आहे. यशवंतराव चव्हाण राजकारणातील उत्तुंग शिखर होते. त्या शिखरापर्यंत जाण्यासाठी असणार्या पायर्यांपैकी पहिल्या पाहिरीवर तरी आज आपण आहोत कां? याचे आत्मपरिक्षण राजकारणातील प्रत्येकाने करावे”, असे सांगून “फलटणमध्ये होत असलेल्या या १२ व्या साहित्य संमेलनाचे सातत्य आणि कार्यक्रमाचे वैविध्य ही दुर्मिळ गोष्ट आहे. यशवंतरावांच्या नावाने होणारे हे महाराष्ट्रातील एकमेव साहित्य संमेलन आहे”, असे गौरवोद्गारही प्रा. जोशी यांनी व्यक्त केले.
पुरस्कारांचे वितरण व विशेष सत्कार संपन्न
म.सा.प. फलटण शाखेच्यावतीने श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष स्व.सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण साहित्यिक गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध वक्ते प्रा.मिलिंद जोशी व ज्येष्ठ साहित्यिक सर्ज्या’कार सुरेश शिंदे यांना, तर महाराजा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि; पुरस्कृत यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्कार बुलढाणा अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सहसंस्थापक शिरीष देशपांडे यांना संमेलनाध्यक्ष इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य विनोद कुलकर्णी, कर्नाळा (जि.सांगली) येथील ज्ञान संसाधन व संशोधन केंद्राचे संस्थापक महमदशफीक संकेश्वरा व चरित्र अभ्यासक आणि लेखक अमर शेंडे, कवी ताराचंद्र आवळे यांचाही विशेष सत्कार इंद्रजित देशमुख व प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते संपन्न झाला.
प्रारंभी दीपप्रज्ज्वलनाने प्रा.मिलींद जोशी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन संपन्न झाले. दिलीपसिंह भोसले यांनी स्वागतपर मनोगतात, “संमेलन आयोजनामागे युवापिढीसमोर यशवंतराव चव्हाणांचे चरित्र आणण्याचा उद्देश आहे”, असे स्पष्ट केले तर डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी प्रास्ताविकात “यशवंत विचार सर्वदूर पोचवण्यासाठी संमेलन दरवर्षी आयोजित केले जाते”, असे सांगितले. रविंद्र बेडकिहाळ यांनी विशेष सत्कारार्थी मान्यवरांचे कार्य विषद केले. सुरेश शिंदे व शिरीष देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सौ. सिमा गोडसे – मुळीक यांनी तर आभार म.सा.प.फलटण शाखा कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे यांनी मानले.
संमेलनास साहित्य, शिक्षण, सहकार, सामाजिक आदी क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, संमेलन संयोजक संस्थांचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कारार्थींचे दातृत्त्व
‘यशवंतराव चव्हाण साहित्यिक गौरव पुरस्कार’ प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे यांनी २१ हजार रुपये तर ‘यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्कारा’चे मानकरी शिरीष देशपांडे यांनी ११ हजार रुपयांची देणगी साहित्यीक उपक्रमांसाठी महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेस प्रदान केली. त्यांच्या या दातृत्त्वाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.