तलाठी, ग्रामसेवकांनी आपले कार्यक्षेत्र सोडू नये

 प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांच्या सूचना


दैनिक स्थैर्य । 27 मे 2025 । फलटण । ‘‘फलटण तालुक्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर तलाठी व ग्रामसेवकांनी आपले कार्यक्षेत्र सोडून अन्यत्र कोठेही जावू नये’’, अशा सूचना फलटण प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांनी दिल्या आहेत.

फलटण शहर व ग्रामीण भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असलेने सदर परिस्थितीचा व शासकीय आपत्कालीन व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी फलटण तहसिलदार कार्यालयात आयोजित बैठकीत प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर बोलत होत्या. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, तहसिलदार डॉ. अभिजीत जाधव, नायब तहसिलदार अभिजीत सोनवणे, मुख्याधिकारी निखील मोरे , श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, माणिकराव सोनवलकर आदींची उपस्थिती होती.

‘‘आत्ताची वेळ आपत्तीची असल्याचे त्याचे गांभीर्य ओळखून आपापले काम करा. कितीही कमी नुसकास असले तरी त्यांचा पंचनामा करणे अनिवार्य आहे. शेतीमध्ये झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे होणे आवश्यक असून ज्या शेतकर्‍यांनी फार्मर आयडी काढले नाहीत त्या शेतकर्‍यांचे मदत देणे सुलभ होण्यासाठी त्यांचे तातडीने फार्मर आयडी काढा’’, अशाही सूचना प्रांताधिकारी सौ. आंबेकर यांनी दिल्या.

‘‘पुरपरिस्थितीत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांना जी काही मदत लागेल ती तातडीने होणे आवश्यक आहे. कोणतीही अडचण असल्यास थेट प्रांताधिकारी अथवा तहसिलदारांना संपर्क साधावा. ग्रामसेवक अथवा ग्रामपंचायतीने सहकार्य केले नाही तर त्याबाबत तातडीने कल्पना द्यावी, आमच्या स्तरावर आम्ही त्यांना योग्य ते निर्देश देवू’’, असेही प्रांताधिकारी सौ. आंबेकर यांनी स्पष्ट केले.

Back to top button
Don`t copy text!