आत्ताच निवडणूक घ्या, तुम्ही मोदींच्या नावानं मतं मागा, मी बाळासाहेबांच्या नावानं मतं मागतो

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २६ मार्च २०२३ | मालेगाव |

भाजपाचे चंद्रकांत पाटील हे प्रदेशाध्यक्ष असताना ते म्हणाले होते की, आम्ही मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे आणि आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी येणार्‍या निवडणुकीबाबत जागा वाटपाचं वक्तव्य करताना शिंदे शिवसेनेला ४८ जागा देण्याचे वक्तव्य केले होते. त्यांना ४८ नाहीतर ५२ जागा द्या, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. तसेच आत्ताच निवडणूक घ्या, तुम्ही मोदींच्या नावानं मतं मागा, मी बाळासाहेबांच्या नावानं मतं मागतो, असं ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणूक लढणार हे जाहीर करा, असं आव्हान देखील त्यांनी यावेळी दिले.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. मालेगावातील सभेचं आयोजन अद्वय हिरे यांनी केले होते. या सभेसाठी संजय राऊत, विनायक राऊत मालेगावात दोन दिवस अगोदर दाखल झाले होते.
सभेत भाषण करताना सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी कांदा उत्पादक शेतकर्‍यांचा प्रश्न मांडला. यावेळी त्यांनी दोन शेतकर्‍यांचा दाखला दिला. रतनकाका भागवत आणि कृष्णा डोंगरे या कांदा उत्पादक शेतकर्‍यांना उत्तर द्या, असं चॅलेंज ठाकरे यांनी दिलं. यावेळीच त्यांना सुहास कांदे यांच्यावर टीका केली. कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे काळोखात पाहणी करत असून त्यांना दिव्यदृष्टी असल्याची टीका ठाकरे यांनी केली.

हिंडेनबर्ग रिपोर्टच्या अहवालावरून उद्धव ठाकरे यांनी देशातील तपास यंत्रणांच्या गैरवापरावर हल्लाबोल केला. अनिल देशमुखांच्या नातीची चौकशी करण्यात आली. तिकडे लालू प्रसाद यादव यांच्या सुनेची बेशुद्ध होईपर्यंत चौकशी करण्यात आली,असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुमच्या कुटुंबीयांना एक न्याय आणि आमच्या कुटुंबीयांना एक न्याय, असा नियम लावला जात असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. राहुल गांधीच्या २० हजार कोटींच्या प्रश्नावर भाजपची गुपचिळी असून आपली एकी फोडण्यासाठी राहुल गांधींना डिवचलं जातंय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

राहुल गांधींनी वीर सावकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. आपण एकत्र आलो आहोत, लोकशाही वाचवण्याठी एकत्र लढू, पण राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान करू नये. सावरकरांनी जे कार्य केलं ते येड्यागबाळ्याचं काम नाही. सावरकरांनी १४ वर्ष रोज मरण सहन केलं असून ते आमचे दैवत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!