स्थैर्य, खंडाळा,दि. 31 : अंदोरी गावामध्ये कांचन वस्तीवर चार करोना बाधित रुग्ण आढळले असून तो परिसर कन्टेनमेंट झोन घोषीत करण्यात आला आहे. मात्र एका रुग्णाचा गावात अनेकांशी संपर्क आल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपुर्ण गाव कन्टेनमेंट झोन करणे व कडक लॉकडाऊन पाळणे गरजेचे आहे. करोना बाबत गावाने काळजी घेतली तरच गावावर आलेले कोरोनाचे संकट कमी होणार आहे. त्यामुळे गावात काटेकोर उपाय योजना करा, असे प्रतिपादन आ. मकरंद पाटील यांनी केले.
अंदोरी, ता. खंडाळा येथे चार करोना बाधित रुग्ण अढळले असून या गावामध्ये प्रशासन व ग्रामस्थाच्यावतीने करण्यात येत असलेल्या कामाचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी सभापती राजेंद्र तांबे, माजी कृषी सभापती मनोज पवार, जिल्हा परिषदेच्या सदस्या दीपाली साळुंखे, बाळासाहेब साळुंखे, तहसीलदार दशरथ काळे, गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश पाटील, सपोनि. संतोष चौधरी आदी मान्यवराची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पाटील म्हणाले, करोना बाधित रुग्णाच्या लोरिस्क संपर्कात आलेल्या लोकांना होमक्वारंटाईन केले असले तरी कसल्याही परिस्थितीमध्ये ती घराबाहेर पडणार नाहीत याची काळजी घ्या. संकट काळात कोणी लांबचा जवळचा नाही. कसल्याही परिस्थितीमध्ये करोना चे संकट संपवायचे आहे. ग्रामस्थांनी सहकार्य केले तरच ही लढाई यशस्वी होईल. अंदोरी गाव पुढे होऊन काम करतेय ही चांगली गोष्ट आहे.
यावेळी जिजाबा धायगुडे, शामराव धायगुडे, नानासाहेब ननावरे, डॉ. नानासाहेब हांडबर, यशवंत खुंटे, किसन ननावरे, दत्तात्रय धायगुडे, अशोक धायगुडे, संजय जाधव, सुधाकर होवाळ, सरपंच वंदना भिसे, उपसरपंच सुरेश नरुटे, नवनाथ ससाणे, प्रदीप होळकर, ग्रामविकास अधिकारी रविंद्र धायगुडे, तलाठी रुपाली यादव, आरोग्य सेविका, आशा व अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.