दैनिक स्थैर्य । दि. १४ डिसेंबर २०२२ । मुंबई । महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिवीर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांच्या कार्याला कमी लेखत त्यांचा नेहमीच निंदनीय शब्दात अपमान करणाऱ्या वृत्ती आणि प्रवृत्तीचा जाहीर निषेध बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने करण्यात आला.
राष्ट्रपुरुषांचा अपमान करणारे व्यक्तव्य राजदूत भगतसिंग कोश्यारी, चंद्रकांत पाटील, राम कदम, सुधांशु त्रिवेदी, रावसाहेब दानवे, प्रसाद लाड अश्या ठराविक राजकीय पक्षांच्या काही ठराविक राजकीय कंपूकडून सातत्याने होत आहे म्हणून अश्या राजकीय पक्ष व नेत्यांवर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करा असे निवेदन पत्र कीडवाई नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम मॅडम यांना बौद्धजन पंचायत समिती, शिवडी गट क्र. १३, संलग्न सर्व शाखा, त्यांचे पदाधिकारी व विविध संघटना, संस्थांच्या वतीने देण्यात आले.
या शिष्टमंडळाचे नेतृत्व बौद्धजन पंचायत समिती, शिवडी गट क्र. १३ चे गटप्रमुख राजाभाऊ तथा रामदास गमरे व बुद्धविहार सेवा संघाचे भाई जाधव यांनी केले व त्यांच्यासोबत अशोक कदम, विश्वभारती सेवा मंडळचे सिताराम कांबळे, रिपब्लिकन सेनेचे भगवान साळवी, वंचित बहुजन आघाडीचे सुनील जाधव, काशिनाथ पवार, रायबा सकपाळ, अनंत मोहिते, राहुल कदम, शाखांचे अध्यक्ष हरीश मोरे, श्रीधर मोरे, प्रवीण तांबे, अजित मोरे, मोहिते, दया पवार, कामगार नेते रमेश जाधव व विविध शाखा, संघटना, संस्थांचे ४०-५० कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने निवेदन सादर करून सदर कृत्याचा निषेध व्यक्त करून, सदर निवेदन वरिष्ठांपर्यंत सादर करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी विनंती केली.
निवेदन सादर केल्यानंतर राजाभाऊ तथा रामदास गमरे यांनी विभागातील सर्व संलग्न शाखांच्या पदाधिकारी, सदस्य, विविध समित्या, संघटना, संस्थांचे पदाधिकारी, सदस्य यांचे आभार मानून “पुन्हा असा प्रकार घडल्यास बौद्धजन पंचायत समिती, विविध पक्ष, विविध संघटना, संस्था, समितींचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे समर्थक व भीमसैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत” असे प्रतिपादन करून, उपस्थितांस शांततेच्या मार्गाने घरी जा असे सांगून समारोप घेतला.