बेकायदेशीर प्लॉटिंग करणार्‍यांवर कठोर कारवाई करा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 19 मार्च 2025। फलटण । सस्तेवाडी, ता. फलटण येथील पोट पाट मोडून त्याठिकाण बेकादेशीरपणे प्लॉटिंग करून शेतकर्‍यांना दमदाटी करत आहे. या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी., अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मूळ जमिन मालक स्नेहलता देशमुख, विशाल देशमुख यांनी गुंडांना घेऊन येऊन सस्तेवाडी येथील गट क्रमांक 48/3/1 व 48/3/2 मधील पोटपाट मोडून त्याठिकाणी बेकायदेशीर प्लॉटिंग केले आहे. पोटपाट मोडल्याने याठिकाणच्या 30 ते 35 हेक्टर जमिनीवरील सिंचन धोक्यात आले असून पाण्याअभावी पीक जळून जात आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, संबंधितांनी या पोटपाटाची दुरुस्ती करावी अन्यथा सिंचन व्यवस्थापन 2005 अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल. याठिकाणी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग पुणे यांचे 0 हे 26 आर क्षेत्राची नोंद आहे. याबाबत नागेश्वर पाणी वापर संस्थेला संबंधितांनी नोटीस दिली होती. तरी गुंडांना हाताशी धरुन मुंबई तुकडेबंदी कायद्याचा भंग करून या शेतजमिनीचे बेकायदेशीर तुकडे पाडून विक्री करणार आहेत.
तरी दुय्यम निबंधक यांनी वरील मिळकतीचे कोणतेही बेकायदेशीरपणे दस्तनोंदणी करून नये व यांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा शेतकरी शासनाच्या विरोधात आंदोलन करतील याची दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर नितीन यादव, डॉ. रविंद्र घाडगे, निखिल नाळे, शंकर जाधव, यशवंत जाधव, सौ. संगिता नाळे, विवेक जाधव, सूर्यकांत जाधव, मयूर भोंगळे, प्रमोद गाडे आदी शेतकर्‍यांच्या सह्या आहेत. या निवेदनाच्या प्रती महसूलमंत्री, जिल्हाधिकारी सातारा, उपविभागीय अधिकारी फलटण, तहसिलदार, दुय्यम निबंधक फलटण, कार्यकारी अभियंता, निरा उजवा कालवा यांना देण्यात आल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!