
स्थैर्य, फलटण, दि. १५ सप्टेंबर: श्रीनगर येथील दर्गा परिसरात लावण्यात आलेल्या एका बोर्डवरील राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभाची विटंबना केल्याचा आरोप करत, याप्रकरणी दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी भीम आर्मी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन फलटणचे उपविभागीय दंडाधिकारी यांना देण्यात आले.
भीम आर्मीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीनगर दर्गा येथे लावण्यात आलेल्या एका बोर्डवर असलेले राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक, अशोक स्तंभ काही कट्टरपंथीय मुस्लिम व्यक्तींकडून तोडण्यात आले, ही देशाचा अवमान करणारी घटना आहे. देशाच्या ऐक्य, अखंडता आणि लोकशाहीला बाधा आणणाऱ्या अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचून काढले पाहिजे, असेही संघटनेने म्हटले आहे.
या निवेदनातून भीम आर्मीने अत्यंत संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. “जो कोणी देशाच्या राष्ट्रीय चिन्हाचा, संविधानाच्या प्रतीचा किंवा राष्ट्रध्वजाचा अपमान करेल, तो देशाचा दुश्मन आहे. अशांवर कठोरात कठोर कारवाई करावी आणि वेळप्रसंगी त्यांना गोळ्या घालाव्यात,” अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
हे निवेदन देतेवेळी भीम आर्मीचे अजित संभाजी मोरे, लक्षण काकडे, सुनील पवार, आदेश कांबळे, भाग्यश्री बनसोडे, कुणाल अहिवळे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

