
स्थैर्य, फलटण, दि. ११: फलटण शहर व तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने सर्वेक्षण, तपासणी, उपचार यामध्ये सातत्य राखण्या बरोबर कंटेनमेंट झोन बाबत विशेष दक्षता घेण्याच्या सूचना केंद्रीय कमिटी सदस्यांनी आज फलटण मध्ये केल्या आहेत.
असि. प्रोफेसर कम्युनिटी मेडिसीन डॉ. प्रीतम महाजन आणि डॉ. गिरीश या द्विसदस्य केंद्रीय समितीने आज फलटण शहर व तालुक्यातील कोरोना परिस्थितीची माहिती घेऊन, प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर वरीलप्रमाणे सूचना केल्या आहेत. सातारा जिल्हा परिषद उप आरोग्याधिकारी डॉ. सचिन पाटील व फलटण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रांत पोटे यांनी त्यांच्या समवेत शहर व तालुक्यात प्रा. आरोग्य केंद्र, कंटेनमेंट झोन यांना भेटी देऊन त्यांना आवश्यक माहिती दिली.
राजाळे प्रा. आरोग्य केंद्र, शंकर मार्केट येथील नागरी आरोग्य सेवा केंद्र आणि कंटेनमेंट झोन येथे भेट देऊन दोन्ही समिती सदस्यांनी कोरोना बाधीत रुग्ण, ग्रामस्थ, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका वगैरे विविध घटकांशी चर्चा करुन माहिती घेतली तसेच कोरोना तपासणी, लसीकरण, औषधोपचार, कंटेनमेंट झोन याबाबत सविस्तर माहिती घेऊन संबंधीतांना मार्गदर्शन केले.
उप जिल्हा रुग्णालय फलटण येथील कोरोना उपचार केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्था, रुग्ण संख्या, लसीकरण तापमान व्यवस्थित सांभाळले जात आहे काय वगैरेची पाहणी केल्यानंतर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. व्यंकट धवन यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली.
दहाबिघे, विडणी व स्वामी विवेकानंद नगर, फलटण येथील कंटेनमेंट झोन बाबत माहिती घेतल्यानंतर त्याबाबत काही सूचना करतानाच अंमलबजावणी अधिक काटेकोर व कडक करण्याच्या सूचना केल्या आहेत.
तहसील कार्यालयात केंद्रीय कमिटीचे दोन्ही सदस्यांनी इन्सिडंट कमांडर तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर मोहन यादव यांच्याशी शहर व तालुक्यातील कोरोना स्थिती, वाढते बाधीत रुग्ण, तपासण्या, उपचार, उपलब्ध बेडस व वैद्यकीय साधने, सुविधा तसेच कंटेनमेंट झोनची अंमलबजावणी याबाबत चर्चा केली, त्यावेळी उप जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सचिन पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रांत पोटे उपस्थित होते.