
दैनिक स्थैर्य । दि. १७ नोव्हेंबर २०२२ । सातारा । सातारा शहरात रिक्षांची संख्या वाढली आहे. कोरोनानंतर पुन्हा रिक्षावाल्यांचा व्यवसाय सुरु झाला आहे.रिक्षावाल्यांच्या अनेक समस्या असून त्या सुटल्या पाहिजेत. एक किलोमीटरसाठी ३० रुपये, मीटरची चिप बदलण्यासाठी कमी दर आकारणी करणे आदीं मागण्यांबाबत तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी वजा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना केली. याबाबत लवकरच तोडगा काढू असे जयवंशी यांनी सांगितले.
रिक्षावाल्यांच्या भाडेवाढ, मीटरची चिप बसविण्यासाठी कमी पैसे आकारावेत, शहरात रिक्षा स्टॉप वाढवावेत, रिक्षांची संख्या जास्त झाल्याने नवीन परवाने देऊ नयेत, रस्त्यांच्या कामामुळे बंद झालेले रिक्षा स्टॉप पुन्हा सुरु करून द्यावेत, स्टॉपवर रिक्षांची संख्या वाढवावी, रिक्षाच्या पाठीमागे नाव लिहिण्याची सक्ती करू नये आदी मागण्यांसाठी साताऱ्यातील विविध रिक्षा संघटनांनी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली होती. रिक्षावाल्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आज जिल्हाधिकारी जयवंशी यांची भेट घेऊन आ. शिवेंद्रसिंहराजेंनी रिक्षावल्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी, अनिल कुर्लेकर, अनिल चिकणे, विकी रणभिसे, गिरीश खंदारे, महेंद्र जाधव, काका जाधव, विठ्ठल कांबळे, रोहन इनामदार, प्रकाश गोळे, शिरीष गोळे, बलराज त्रिंबके, प्रदीप शिरसाट, सुशांत पवार, सुरेश पवार, मजहर शेख, गिरीश खंदारे, बाळासाहेब खंदारे, सिद्धनाथ भुजबळ, विष्णू जांभळे, संशोधन सपकाळ, सागर पवार, महेश महापरळे, अनिल सोनावणे, अप्पा नलवडे, कैस काजी, दीपक वाळवेकर यांच्यासह अनेक रिक्षाचालक, मालक उपस्थित होते.
यावेळी रिक्षाचालकांनी आपल्या समस्या मांडल्या. रिक्षावाल्यांना दिलासा मिळण्यासाठी त्यांच्या समस्या सुटल्या पाहिजेत. शासनाचे नियम असले तरी, समस्यांवर तोडगा काढता येऊ शकतो. आपल्या अध्यक्षतेखाली असलेल्या ग्राहक पंचायतीमध्ये चर्चा करून मागण्यांबाबत आपण सकारात्मक निर्णय घ्यावा. असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. जिल्हाधिकारी जयवंशी यांनी रिक्षावाल्यांच्या समस्या सोडविण्याबाबत आपण योग्य तोडगा काढू असे आश्वासन यावेळी दिले.