दैनिक स्थैर्य । दि. ०३ नोव्हेंबर २०२१ । फलटण । फलटण तालुका क्रीडा संकुलामध्ये उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन कोर्टचा लाभ शहर व तालुक्यातील बॅडमिंटन खेळाडूंनी घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते या बॅडमिंटन कोर्टचे उदघाटन करण्यात आले त्यावेळी, तालुका क्रिडा संकुल समितीचे अध्यक्ष आमदार दीपक चव्हाण, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, फलटण तालुका क्रीडा संकुल समितीचे कार्याध्यक्ष तथा फलटणचे तहसीलदार समीर यादव, लोणंद नगर पंचायतीचे मुख्याधिकारी हेमंत ढोकले, तालुका क्रीडा संकुल समितीचे सचिव तथा तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे, सचिन धुमाळ, संदीप ढेंबरे, भगत सर यांची उपस्थिती होती.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा माध्यमातून जाधववाडी (फलटण) येथे तालुका क्रीडा संकुल उभारणी सुरु आहे. सद्यस्थितीत तेथे ४०० मीटर धावणे मार्ग, प्रशासकीय इमारत व बहुउद्देशीय हॉल उभारण्यात आला आहे.
आमदार अन संजिवराजेंच्या विरुद्ध प्रांताधिकारी असा रंगला सामना
फलटण येथील तालुका क्रीडा संकुल येथे उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन कोर्टाचे उद्घाटन केल्यानंतर फलटणचे आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे एका टीम मध्ये तर फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप हे एकटेच एका टीममध्ये अश्या टीम तयार होवून काही वेळ बॅडमिंटन खेळण्यात आले. प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांच्या टीम मध्ये इतर कोणतेही अधिकारी न येता त्यांनी एकट्यानेच आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या विरुद्ध बॅटिंग केली.