
स्थैर्य, कराड दि. 19 : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजना असून या योजनाचा महिलांनी अभ्यास करून त्याचा लाभ घेऊन आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये बदल घडून आणावा. शासनाच्या अधिकृत दुकानातूनच शेतकर्यांनी निविष्ठा खरेदी कराव्यात. ‘सेंद्रिय’च्या नावाखाली जे बांधावर येऊन खते, औषधं विक्री करतात ती खरेदी करू नयेत. तसे होत असल्यास शासनाच्या निदर्शनास आणावे, असे आवाहन सातारा जिल्हा कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांनी केले.
शेनोली ता.कराड येथे श्री समर्थ कृपा कृषी उद्योग व उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, कराड पंचायत समिती च्या वतीने महिलांची शेती कार्यशाळा, परसबागेच्या महत्त्व व मोफत बियाणे वाटप या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विनायक पवार बोलत होते. यावेळी मंडल कृषी अधिकारी सैदापूर विनायक कदम, कृषी पर्यवेक्षक विनोद कदम, उमेद अभियान व्यवस्थापक कराड पंचायत समितीचे निलेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विनायक कदम यांनी शासनाच्या विविध योजना शेतकर्यांच्यासाठी किती उपयुक्त आहेत याबद्दल सविस्तर माहिती दिली. रोजगार हमी योजना, फळबाग योजना, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, शेतकर्यांच्यासाठी विविध अवजारे कशा पद्धतीने दिली जातात व किती प्रमाणात अनुदान दिले जाते या सर्व योजनांची माहिती देण्यात आली. निलेश पवार यांनी उमेद च्या वतीने तालुक्यामध्ये सुरु असणार्या कामांचा आढावा घेवून15 जून ते 15 जुलै या कालावधीत परसबाग कशा पद्धतीने केली पाहिजे. पंधराच्या गोल वर्तुळाकार पद्धतीमध्ये कोण कोणती भाजीपाला पिके घेतली पाहिजेत. त्याबद्दल माहिती दिली.
यावेळी श्री समर्थ कृपा कृषी उद्योग ची सामाजिक बांधिलकीतून बचत गटातील 500 महिलांना परस बागेची मोफत बियाणे वाटप करण्यात आली. या कार्यक्रमास सरपंच विक्रम कणसे, उपसरपंच संगीता माळी, विभाग समन्वयक चिन्मय वराडकर, सुशांत तोडकर, शेनोली सावली ग्राम संघाच्या अध्यक्ष सौ. सुनंदा कणसे, सिआरपी सोनाली साळुंखे यांचेसह गावातील महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.