ऐतिहासिक लाल महालात गाण्याचे चित्रीकरण करणाऱ्यांवर कारवाई करा – खासदार उदयनराजे भोसले यांचा सोशल मीडियावर संताप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २२ मे २०२२ । सातारा । पुणे शहरातील ऐतिहासिक लाल महल या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व असून महाराष्ट्रातील संपूर्ण शिवप्रेमींची अस्मिता आहे. या वास्तूतील छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या शिल्पाचे पावित्र्य मोठी आहे. येथे चित्रीकरण कसे झाले ? मुळात लाल महल आणि त्याचा अंतर्गत भाग ही चित्रीकरणाची जागा नाही. याचे भान संबंधितांनी ठेवायला हवे. तसेच संबंधित चित्रीकरण सिनेमात वापरण्यात येऊ नये. ज्यांनी या चित्रीकरणाला परवानगी दिली अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी सोशल मीडियातून केली आहे.

पुणे येथील ऐतिहासिक लाल महालामध्ये एका चित्रपटाच्या गाण्याचे चित्रिकरण सुरू असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे. त्या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर दिलेल्या एका प्रतिक्रियांमध्ये नमूद आहे की लाल महाल ही वास्तू नाचगाण्याच्या चित्रीकरणाची जागा नाही. या ठिकाणी ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक प्रश्नासंबंधित चित्रीकरणास आमचा आक्षेप नाही पण या वास्तूचा इतिहास लक्षात घेऊन चित्रीकरण आणि त्याचे विषय निवडणे गरजेचे आहे. केवळ व्यवसाय घेतलेल्या कोणी वास्तूचा वापर करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. पोलिसांनी दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

मुळात ही वास्तू पुणे महानगरपालिका ताब्यात असून या चित्रीकरणासाठी महापालिकेची रीतसर परवानगी घेतली आहे काय ? कोणत्या अधिकाऱ्यांनी ही परवानगी दिली ? जर परवानगी दिली असेल तर कोणती परवानगी दिली गेली ? याची चौकशी झाली पाहिजे असे सवाल उदयनराजे यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारले आहेत.


Back to top button
Don`t copy text!