
स्थैर्य, सातारा, दि. 10 सप्टेंबर : चंद्रग्रहणाच्याअंधश्रद्धा समाजमाध्यमावर खूप मोठ्या प्रमाणात पसरविण्यात आल्या. गर्भवती महिलांनी ग्रहण काळात एकाच जागेवर बसावे, पाणी पिऊ नये, तसेच मलमूत्र विसर्जन करू नये अशा स्वरूपाचे अवैज्ञानिक सल्ले दिले जात होते, तसेच ग्रहणाचा गरोदर बाईच्या पोटातील गर्भावर दुष्परिणाम होतो, अशा अंधश्रद्धा देखील पसरविण्यात आल्या होत्या. त्यामुळे ग्रहणासंबधी अंधश्रद्धा पसरवणार्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने करण्यात आली आहे.
अनिसंच्यावतीनेे चंद्रग्रहण एक साधी खगोलीय घटना आहे. त्यामध्ये कोणतीही नवीन ऊर्जा किंवा किरणे तयार होत नसतात. दर सहा महिन्यांनंतर पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांच्या समान पातळीमध्ये आल्यानंतर होणारा सावल्यांचा हा खेळ किंवा परिणाम असतो, तरीही अन्न सेवन करणे असेल, बाहेर फिरणे असेल किंवा कोणतेही दैनंदिन व्यवहार करण्यास कोणतीही अडचण नसते. तीन वर्षांपूर्वी चंद्रग्रहणाच्या काळात सातार्यात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. राज्यातील अनेक स्त्री रोग तज्ज्ञांच्या संघटनांनी गर्भवती महिलांवर ग्रहणाचा कोणताही परिणाम होत नाही हे वारंवार सांगितले असतानाही अनेक जण सोशल मीडियावर सातत्याने ग्रहणाविषयी अंधश्रद्धा पसरवतात. एका बाजूला यान चंद्रावर पाठवण्याची तयारी करणारा भारत अजूनही ग्रहणातील अंधश्रद्धांना बळी पडतो आहे. वैद्यकीय बाबींच्या संबंधाने गैरसमज आणि चुकीची माहिती पसरवणार्या गोष्टींच्या विरोधात शासनाने कठोर कार्यवाही करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मागील काही प्रकरणामध्ये दिली आहे.
शासनाने ग्रहणाविषयी अंधश्रद्धा पसरविणार्यांवर कारवाई करण्याची मागणी अंनिसमार्फत राहुल थोरात, डॉ. हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, रामभाऊ डोंगरे, सम्राट हटकर, अण्णा कडलास्कर, डॉ. अशोक कदम, मुंजाजी कांबळे, प्रकाश घादगिने, मुक्ता दाभोलकर, फारुख गवंडी, प्रवीण देशमुख यांनी पत्रकाद्वारे केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात अनेक भागांत महाराष्ट्र अंनिसविषयी ग्रहणाच्या निमित्ताने प्रबोधन कार्यक्रम करण्यात आले आणि टेलिस्कोपमधून लोकांना ग्रहण दाखविण्यात आले, तसेच सोशल मीडियामध्ये ग्रहणाविषयी गैरसमज दूर करणारी प्रबोधन मोहीम राबविल्याचे समितीने सांगितले.