दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑक्टोबर २०२१ | सातारा | पंढरपूर येथे धनगर समाजातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ नराधमांना कठोर शासन करण्यात यावे, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्यावतीने जिल्हाध्यक्ष दादा ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंढरपूर या संताच्या भूमीमध्ये धनगर समाजाच्या अल्पवयीन मुलीवर काही समाजकंटकांनी अत्याचार केला. या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देवून कुटुंबियांनासुध्दा मारण्यात येईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, तिचे नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास गेले असता तक्रार घेतली जात नाही. संबंधित गुन्हेगार हा राजकीय पुढाऱ्यांचा नातेवाईक असल्यामुळे पोलिसांकडून त्याला अभय देण्यात येत आहे त्यामुळे त्याला सहकार्य करणाऱ्यांना सहआरोपी करुन संबंधित खटला फास्ट टॅक कोर्टात चालवण्यात यावा व दोषींना शिक्षा करावी.
या आंदोलनास युवक जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे, विक्रम वाघमारे, संजय कांबळे, मदन खंकाळ, किरण ओव्हाळ, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा संगीता शिंदे, सागर फाळके आदी उपस्थित होते.