अर्धवट कामांप्रकरणी ठेकेदारावर कारवाई करा; अन्यथा १५ ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा

अमरसिंह खानविलकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; 'व्ही स्क्वेअर कन्स्ट्रक्शन'ला काळ्या यादीत टाकण्याची मागणी


स्थैर्य, फलटण, दि. १३ ऑगस्ट : फलटण शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील विविध विकासकामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या ‘व्ही स्क्वेअर कन्स्ट्रक्शन’ या ठेकेदार फर्मला काळ्या यादीत टाकावे आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा १५ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा अमरसिंह खानविलकर यांनी दिला आहे.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फलटण नगरपरिषदेने संबंधित ठेकेदाराला दि. १२ ऑक्टोबर २०२१ रोजी कार्यादेश दिला होता. ही कामे एप्रिल २०२२ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक असतानाही, अद्याप ती अपूर्ण आहेत.

याप्रकरणी वेळोवेळी पाठपुरावा करूनही नगरपरिषद प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, असा आरोप खानविलकर यांनी केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने निर्देश देऊनही आणि मुख्याधिकाऱ्यांनी तीन वेळा नोटीस बजावूनही ठेकेदाराने काम पूर्ण केलेले नाही. त्यामुळे ठेकेदाराला पाठीशी घातले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

त्यामुळे, ‘व्ही स्क्वेअर कन्स्ट्रक्शन’ला त्वरित काळ्या यादीत टाकून संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अन्यथा १५ ऑगस्टपासून उपोषणास बसणार असल्याचे अमरसिंह खानविलकर यांनी निवेदनात म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!