स्थैर्य, मुंबई, दि.५: महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उत्तर प्रदेशमध्ये महिला नेत्यांसोबतच्या पोलीस वर्तनावर तीव्र आक्षेप घेतले आहेत. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्यासोबतच्या पोलिसांच्या गैरवर्तनाचा फोटो ट्विट करत चित्रा वाघ यांनी उत्तर प्रदेश पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महिला नेत्यांच्या कपड्यांवर हात टाकण्याची पोलिसांची हिंमत कशी होते, असा संतप्त प्रश्न त्यांनी विचारला. चित्रा वाघ यांनी संबंधित पोलिसांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे.
चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, ‘महिला नेत्यांच्या कपड्यावर हात टाकण्याची पुरुष पोलिसांची हिंमत कशी होते? जर महिला समोर येऊन एखाद्या गोष्टीला पाठिंबा देत असतील तर कुठलेही पोलीस असेना त्यांनी आपल्या मयार्दांचं भान ठेवलं पाहिजे. भारतीय संस्कृतीत विश्वास ठेवणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ दोषी पोलीस कर्मचा-यांवर कारवाई करावी.’
दरम्यान, चित्रा वाघ यांनी हाथरस अत्याचार प्रकरणावरुन महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही टीका केली होती. अनिल देशमुख यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला होता. गृहमंत्र्यांच्या टीकेनंतर चित्रा वाघ यांनी त्यांना प्रत्युत्तर देताना महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची आठवण करुन दिली होती.
हाथरसमधल्या सामूहिक बलात्कारातील पीडितेला श्रद्धांजली अर्पण करताना, ‘फिल्म सिटी’ऐवजी ‘गुंडांपासून क्लिन सिटी’वर आपण भर दिलात तर माताभगिनींसाठी अधिक उपयुक्त ठरेल, असा निशाणा अनिल देशमुख यांनी योगींवर साधला होता. त्यावर ‘कोविड-क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांवर बलात्कार, विनयभंग केले जातात. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय, त्यावर तुम्हाला ट्विट करावंसं वाटलं नाही का?’, असा सवाल चित्रा वाघ यांनी गृहमंत्र्यांना विचारला होता.