
स्थैर्य, सातारा, दि. ०८ ऑगस्ट : गणेशोत्सव काळात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे डॉल्बी चालकांनी तंतोतंत पालन करावे, जे याचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या आहेत. गणेशोत्सव २०२५ च्या तयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
लेझर लाईटमुळे डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात तिच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचे निर्देशही त्यांनी दिले. कोणताही सार्वजनिक गणेश मंडळ लेझर लाईटचा वापर करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. तसेच, गौरी विसर्जनानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस पेट्रोलिंग वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिल्या.
डॉल्बीच्या दणदणाटामुळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता, गणेश मंडळांनी डॉल्बीचा वापर टाळावा, असे आवाहनही या बैठकीच्या निमित्ताने करण्यात आले आहे. नागरिकांना त्रास होणार नाही आणि सण आनंदात साजरा होईल, याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे पालकमंत्री म्हणाले.
या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने उत्सवाचे चांगले नियोजन केले असून सर्वांनी मिळून हा गणेशोत्सव आनंदात व उत्साहात पार पाडावा, असे आवाहनही देसाई यांनी केले.