दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑक्टोबर २०२१ | सातारा | सातारा व कराड तालुक्यात मटका जुगार जबरी चोरी आणि खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन टोळीतील सहाजणांना एक वर्षासाठी सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे . पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी हे आदेश दिले .
सातारा शहर व तालुक्यात मटका अड्डा चालविणे , जबरी चोरी करणे या सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये हवे असणारी समीर सलीम कच्छी वय ३९ रा मोळाचा ओढा , अक्षय अनिल तळेकर , हरपळवाडी ता कराड , शुभम उद्धव इंदलकर वय २८ रा कळंबे ही टोळी बेकायदा मटका चालवित होती . सातारा तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक ए एस चौधरी यांनी या तीन इसमांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव सादर केला होता . या टोळीला पोलीस अधीक्षकांनी महाराष्ट्र पोलीस कायदा55 प्रमाणे एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले .
उंब्रज पोलीस ठाणे हद्दीत सरकारी कर्मचाऱ्या ला मारहाण व खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सूरज मारुती धस टोळी प्रमुख वय २८ माळवाडी पोस्ट मसूर , नितीन चंद्रकांत जाधव वय २५ – रा मसूर , अजय शरद जाधव रा मसूर ता कराड टोळीला हद्दपार करण्याचा प्रस्ताव उंब्रज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी सादर केला होता . या टोळीला पोलीस अधीक्षक बन्सल यांनी सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील खानापूर कडेगाव वाळवा शिराळा या तालुका हद्दीतून हद्दपार केले आहे .
या दोन्ही टोळ्यांना वर्तन सुधारण्याची वारंवार संधी देऊनही त्यांच्यात कोणतीही सुधारणा झाली नव्हती . दहशत व हिंसक कारवायांना आळा बसावा म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे . पोलीस अधीक्षक बन्सल यांनी पदभार स्वीकारल्या पासून 36 प्रस्तावातून 73 जणांना तडीपार केले आहे.