फलटणमधील कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटण शहरासह तालुक्यामध्ये जनावरांची वाहतूक करणार्‍या कुरेशी टोळीला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी हे आदेश दिले.

तौफिक इम्तियाज कुरेशी (वय २३), ईलाही हुसेन कुरेशी (वय २५), अरबाज इम्तियाज कुरेशी (वय २८), ईनायत हुसेन कुरेशी (वय २७, सर्व राहणार कुरेशी नगर, मंगळवार पेठ, फलटण) या चौघांना हद्दपार प्राधिकरणाने तडीपार केले आहे.

फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी या प्रस्तावाची चौकशी करून तो दाखल केला होता. या टोळीतील इसमांवर गुन्ह्यांमध्ये वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांच्या गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. फलटण तसेच परिसरामध्ये सातत्याने गुन्हे ते करत होते. कायद्याचा कोणताच धाक न उरल्यामुळे फलटण तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता. त्यामुळे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ नुसार संबंधित टोळीला सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षाकरिता तडीपार करण्याचा आदेश पारित केला आहे.

नोव्हेंबर २०२२ पासून कलम ५५ प्रमाणे ३१ उपद्रवी टोळ्यांमधील १०० इसमांना तडीपार करण्यात आले आहे. आत्तापर्यंत एकूण १३१ इसमांच्या विरोधात तडीपारची कारवाई झाली आहे, तर एमपीडीए कायद्याअंतर्गत एका इसमावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. भविष्यातही सातारा जिल्ह्यात सराईत गुन्हेगारांच्या विरोधात हद्दपारी, मोका, एमपीडीए अशा कडक कारवाया करण्यात येणार आहेत.

याकामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, केतन शिंदे, अनुराधा सणस, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे वैभव सूर्यवंशी, श्रीनाथ कदम यांनी योग्य तो पुरावा सादर केला.


Back to top button
Don`t copy text!