
तडवळे (ता. फलटण) येथे चतुर्थ तपपूर्ती अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात सुरू आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त ७५० ज्ञानेश्वरी वाचकांनी सहभाग नोंदवला आहे. वाचा सविस्तर कार्यक्रम.
स्थैर्य, तरडगाव, दि. ०८ डिसेंबर : तडवळे (ता. फलटण) येथे चतुर्थ तपपूर्ती अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, गावात भक्तीचा मळा फुलला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून यावर्षी ७५० ज्ञानेश्वरी वाचकांचा महासंकल्प पूर्णत्वास नेण्यात येत आहे. भव्य दिव्य उपस्थितीत सुरू असलेल्या या सप्ताहामुळे संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजरात दुमदुमून गेला आहे.
७५० वाचकांचा ऐतिहासिक संकल्प
समस्त ग्रामस्थ मंडळ तडवळे, श्री विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ आणि विविध मंडळांच्या संयुक्त विद्यमाने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ५ डिसेंबरपासून सुरू झालेला हा सप्ताह १२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. विशेष म्हणजे, ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जन्मोत्सव वर्षाला अनुसरून ७५० भाविक एकाच वेळी ज्ञानेश्वरी पारायण करत आहेत, हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले आहे.
दैनंदिन कार्यक्रम आणि रूपरेषा
सप्ताहादरम्यान दररोज खालीलप्रमाणे भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे:
-
पहाटे ४ ते ६: काकडा आरती
-
सकाळी ७:३० ते ११: सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण
-
सायंकाळी ४:३० ते ५:३०: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज चरित्र कथा (वक्ते: ह.भ.प. कुमार महाराज खराडे)
-
सायंकाळी ५:३० ते ६:३०: हरिपाठ
-
रात्री ७ ते ९: कीर्तन सेवा
-
रात्री ९ नंतर: महाप्रसाद
दिग्गज कीर्तनकारांची मांदियाळी
या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची सेवा ग्रामस्थांना लाभणार आहे. यामध्ये ह.भ.प. महादेव महाराज राऊत, ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कुऱ्हाडे, ह.भ.प. कृष्णाजी महाराज नवले, ह.भ.प. कन्होबा महाराज देहूकर, ह.भ.प. गुरुवर्य बंडातात्या महाराज कराडकर, ह.भ.प. पोपट महाराज पाटील आणि ह.भ.प. राम महाराज डोंगर यांचा समावेश आहे. सप्ताहाची सांगता ह.भ.प. जयवंत महाराज बोधले यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.
भाविकांच्या सेवेसाठी ग्रामस्थ सज्ज
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ह.भ.प. अनिल महाराज कुंभार, ह.भ.प. कुमार महाराज खराडे, ह.भ.प. सचिन महाराज मदने, ह.भ.प. दत्ता महाराज खराडे, ह.भ.प. वैष्णव महाराज भोसले यांच्यासह गावातील विविध मंडळांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ अथक परिश्रम घेत आहेत. भाविकांनी या धार्मिक सोहळ्याचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

