स्थैर्य, पुणे, दि.४: हॉटेल, रेस्टॉरंट आणि
बार सोमवारपासून सुरू होत आहेत. मात्र, बंद काळातील उत्पादन शुल्क
परवान्याचे सहा महिन्यांच्या शुल्क माफीचा आदेश न आल्याने संपूर्ण शुल्क
भरण्याची टांगती तलवार हॉटेल व्यावसायिकांवर कायम आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च
महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन (टाळेबंदी) जाहीर झाला. तेव्हापासून
हॉटेल व्यवसाय बंद आहे. टाळेबंदी शिथिल करण्यात आल्यानंतर हॉटेलला पार्सल
सुविधा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली.
आता, सोमवारपासून हॉटेल आणि बार पन्नास
टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता बार सुरू
ठेवण्यासाठी हॉटेल चालकांना परवाना शुल्क भरावे लागेल.
सहा महिने बंद असल्याने सहा महिन्यांचे
शुल्क माफ करावे अशी मागणी हॉटेल संघटनांनी केली होती. मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यास अनुकूलता
दर्शवली होती. मात्र त्या बाबतचा आदेश प्राप्त झाला नसल्याने उत्पादन शुल्क
विभागाचे अधिकारी संपूर्ण शुल्क भरण्यास सांगत असल्याचे काही हॉटेल
व्यवसायिकांनी सांगितले.