मुंबई-पुणे हायवेवर भरधाव ट्रेलरची स्विफ्ट आणि टेम्पोला धडक, दोन जण जागीच ठार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. २९ : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर एका कंटेनरने स्वीफ्ट कारला मागील बाजूने दिलेल्या धडकेत दोघे जण जागीच ठार झाले आहेत, तर पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली होती. ती आता पूर्ववत झाली आहे.

आज सकाळी सव्वा सातच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कंटेनर मुंबईच्या दिशेनं येत होता. खोपोलीजवळ एका उतारावर असताना या कंटेनरने एका स्विफ्ट कारला मागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात स्विफ्ट कारचा चुराडा झाला आहे. कारमधील दोघे जागीच ठार झाले आहेत. अचानक झालेल्या या अपघातामुळे कंटेनरच्या मागून येणाऱ्या गाड्यांचेही नियंत्रण सुटले आणि आणखी दोन गाड्या कंटेनरला धडकल्या.

अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली. मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. महामार्ग पोलीस व अन्य यंत्रणा अपघातस्थळी पोहोचून अपघातग्रस्त गाड्या बाजूला करण्याचे काम सुरू केले. सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर गाड्या बाजूला काढण्यात आल्या असून वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

करोनानंतरच्या लॉकडाऊनच्या काळात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक जवळपास बंद होती. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आता वाहतूक हळूहळू वाढली आहे. त्यानंतर एक्स्प्रेस वे वर झालेला हा पहिला मोठा अपघात आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!