
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा जन्म वैशाख शुद्ध षष्ठी (२८ मे १८८३) या दिवशी झाला. नाशिक जिल्ह्यातल्या भगूर या गावी खाऊनपिऊन सुखी असलेल्या एका परिवारात ते जन्मले. वयाच्या आठव्या वर्षी आई तर वयाच्या पंधराव्या वर्षी प्लेगच्या साथीत वडिलांचंही छत्र नाहीसे झाले. याच सुमाराला प्लेगच्या साथीचे निमित्त करून संबंध पुणे शहराला अत्याचाराने होरपळून टाकणा-या रँड आणि आयर्स्ट या दोघा ब्रिटिश जुलूमशाहांना आपल्या पिस्तुलाने लक्ष्य करून दामोदरपंत चाफेकर हौतात्म्य पावले होते. त्यांच्या फाशीची वार्ता आली, त्या दिवशी हा विनायक अस्वस्थ झाला होता. रात्रभर त्याच्या मनाची उलघाल होत होती. अखेर आपल्या कुलस्वामिनीला स्मरून त्याने मनोमन प्रतिज्ञा केली, ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मी मारता मारता मरेतो झुंजेन!’
विनायकरावांची तडफच विलक्षण होती. तिला योग्य वयाची वाट पाहत बसणे नामंजूर होते. अलौकिक बुद्धिमत्ता, तरतरीत विलक्षण देखणे व्यक्तिमत्त्व, वाङ्मयाचा अफाट व्यासंग, अलौकिक कवित्व, मुर्दाडालाही नवचैतन्य देणारे अमोघ वक्तृत्व आणि असामान्य बेडर स्वभाव ही त्यांची जन्मजात मिळकत होती. त्र्यंबकेश्वरला मित्रमेळ्याचे पहिले संमेलन झाले. त्याला महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून दोनशे प्रतिनिधी हजर होते. याच बैठकीत सावकरांनी मॅझिनीच्या ‘यंग इटली’च्या धर्तीवर मित्रमेळ्याचे ‘अभिनव भारत’ असे नवे नामकरण केले. इंग्लंडमध्ये गेल्यावरही त्यांचे काम जोरात सुरूच होते. सावरकर म्हणजे सशस्त्र क्रांती आणि सशस्त्र क्रांती म्हणजे अभिनव भारत किंवा इंडिया हाऊस हे समीकरण पक्के झाले होते. इटलीच्या स्वातंत्र्यप्रणेता मॅझिनीचे चरित्र सावकरांनी लिहिले. त्याची प्रस्तावनाच एवढी जहाल आणि प्रेरक होती की, तिच्या स्वतंत्र्य पुस्तिका तयार करण्यात आल्या. मुख्य ग्रंथाबरोबर ती प्रस्तावनाही सरकारच्या रोषाला बळी पडली. १८५७च्या स्वातंत्र्यसमराच्या पन्नासाव्या स्मृतिनिमित्त त्यांनी ब्रिटिश सरकारची अस्सल कागदपत्रे तपासून आणि त्या वेळच्या राजकीय व सेनाधिका-यांनी लिहिलेली आत्मवृत्ते अभ्यासून ‘सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर’ हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. सावरकरांचे सगळेच अफाट. त्यांचे विचार असे रोखठोक तशीच कृतीही. लिखाणात समुद्राच्या लाटांचा धडधडाट तर बोलण्यात विजांचा कडकडाट. भारतीय क्रांतीपर्वातील एका मोठय़ा कालखंडावर सावरकर युग अशी छाप पडली.
मार्सेलिस बंदरावर बोट येताक्षणीच सावरकरांनी अद्भुतपणे समुद्रात उडी घेतली आणि फ्रान्सचा किनारा गाठला. अर्थात त्यांना परत पकडण्यात आले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय नीतीचा भंग करणारा निर्णय दिल्याबद्दल हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाची जगभर बदनामी झाली.
सावरकरांच्या आयुष्यातले त्यानंतरचे पर्व म्हणजे अंदमान पर्व. मोठय़ा भावाला आधीच पकडून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावलेली. घरी धाकटा भाऊ आजारी. सगळ्या कुटुंबाची वाताहात झालेली. पन्नास वर्षाची काळ्या पाण्याची सजा भोगण्यासाठी वीर सावरकर अंदमानच्या यातनागृहात येऊन पोहोचले, तो दिवस होता २२ मार्च १९११. या सगळ्या भयंकर प्रकारात, अनिर्बंध छळात सावरकर सावरकरच राहिले. सावरकरांसारखेच वागले. या अंधारकोठडीत त्यांना आत्माविष्कार झाला. दिवसाचे शारीरिक श्रम भोगल्यानंतर रात्रीच्या अंधारात त्यांना आत्मप्रतिभेचे विश्वरूप दर्शन झाले. एरव्हीचा व्याख्याता, लेखक, ग्रंथकार, कवी, बंडखोर, क्रांतिकारक देशभक्त त्या अंधा-या बंदीशाळेत महाकवी झाला. राजप्रसादाचा आश्रय घेऊन नव्हे, तर बंदीपाल आणि लोखंडाच्या अवजड दंडबेड्याचा आश्रय घेऊन. ‘देशभक्ता प्रासाद बंदिशाला’ असे त्याने म्हटले. घायपाताचे काटे किंवा गंजलेले लोखंडी खिळे त्यांची लेखणी झाले. तुरुंगातल्या भिंतींनी आपले कठोर काळीज त्यांच्यापुढं मऊ केले आणि त्यावर प्रतिभेचे ते रंगलेणे मोठय़ा अभिमानाने गोंदवून घेतले. आपले मन वहिनीपुढे उघड करताना त्यांनी म्हटले, ‘अग वहिनी, ‘की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने.’ ’आम्ही दोघंच का, सात भाऊ असतो तरी हेच केलं असतं.’ ही जाज्वल्य निष्ठा, हा एकांतिक अट्टाहास केवळ सावरकरच दाखवू शकले. तेरा वर्षाच्या खडतर तपश्चर्येनंतर त्यांची अंदमानातून सुटका झाली. पुढे रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतूनही त्यांची मुक्तता झाली.
त्यांचे रत्नागिरी पर्वही मोठे दैदीप्यमान आहे. रुढीग्रस्त आणि स्थितीशील हिंदू समाजाची दृढमूल सामाजिक मुक्तता करण्यासाठी त्यांनी युद्धच पुकारले. जीवनाच्या सर्व क्षेत्रात सावरकर युद्धपातळीवर राहिले. राजकारण, धर्मकारण, समाजकारण, इतकेच काय तर साहित्यातही सावरकर चढाई करत राहिले. म्हणून सावरकरांच्या जीवनापासून काळ पन्नास वर्ष पुढे सरकला तरी सर्वच्या सर्व सावरकर समजून घेणे आणि पचवणे फार अवघड वाटते. तो माणूस नखशिखांत क्रांतीच्या रक्ताने झळझळत होता. काळाच्या पुढे चालत होता. मृत्यूलाही थक्क करून सोडणारा. सगळ्या संकटांना अखेपर्यंत आपल्या मागावर ठेवणारा पण मृत्यूचा मात्र निकराने पाठलाग करणारा. हा क्रांतिपुरुष २६ फेब्रुवारी १९६६ रोजी कृतार्थ जीवनाच्या समाधानात आत्मविसर्जन करून अंतर्धान पावला.