
स्थैर्य, फलटण, दि. १७ ऑगस्ट : ‘नशामुक्त भारत’ अभियानाच्या अनुषंगाने, दत्तनगर येथे स्वरूपा अकॅडमी आणि फलटण शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीसाठी मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आणि पोलिसांनी नशेच्या दुष्परिणामांबाबत जागृती करणारे फलक प्रदर्शित करून व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार, जिल्ह्यात दि. १३ ते १७ ऑगस्ट या कालावधीत ‘नशामुक्त भारत’ अभियान राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून, दि. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता दत्तनगर येथे हा उपक्रम राबविण्यात आला.
या मानवी साखळीमध्ये स्वरूपा अकॅडमीचे संस्थापक सुरज दत्तात्रय भिसे, अकादमीचे ३५ ते ४० विद्यार्थी आणि फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अयोध्या घोरपडे, पोलीस अंमलदार महेश जगदाळे, मुकेश घोरपडे, स्वप्नील खराडे आणि पांडुरंग धायगुडे यांनी सहभाग घेतला. या उपक्रमासाठी पोलीस अंमलदार विक्रम कुंभार यांनी विशेष मेहनत घेतली.