
दैनिक स्थैर्य | दि. २६ फेब्रुवारी २०२५ | फलटण | पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण फलटण तालुक्याला हादरवून टाकले आहे. या घटनेत फलटणच्या एका युवतीवर अत्याचार झाल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेनंतर ४८ तास उलटले असतानाही आरोपी अद्यापही मोकाट आहेत. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे पोलीस आयुक्तांना तातडीने पुढील तपासाचे आदेश दिले आहेत.
सदरील घटना अतिशय निंदनीय असून, युवतीच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी संपूर्ण फलटण तालुक्यातील जनता एकत्रितपणे उभी आहे. आमदार सचिन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना तालुक्यातील जनतेच्या भावना निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्यांनी या घटनेबाबत आरोपीला कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले आहे.
माजी आमदार दिपक चव्हाण यांनीही या घटनेची निंदा केली आहे. त्यांनी सांगितले की संपूर्ण फलटण तालुक्यातील जनता युवतीच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. या प्रकरणात पोलिसांनी जलद कारवाई करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.