
दैनिक स्थैर्य | दि. २८ फेब्रुवारी २०२५ | पुणे | पुण्यातील स्वारगेट बसस्थानकाजवळ झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी अखेर अटक केली आहे. काल रात्री उशिरा आरोपी दत्तात्रय गाडे याला त्याच्या मूळ गावातून, शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून अटक करण्यात आली. हा प्रकरणातील आरोपी काही दिवसांपासून फरार होता आणि पोलिसांनी त्याच्या माहितीसाठी नागरिकांना १ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते.
स्वारगेट बसस्थानकाजवळ फलटण येथील एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना प्रकाशात आली होती. आरोपीने तरुणीला दिशाभूल करून बसमध्ये नेऊन अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. या प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती आणि पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी आठ ते दहा पथके तैनात केली होती.
आरोपी दत्तात्रय गाडे याच्या राजकीय कनेक्शनबद्दलही चर्चा सुरू झाली होती. त्याच्या डीपीमध्ये पुण्यातील दोन बड्या नेत्यांसोबतचे फोटो समोर आले होते. मात्र, त्याच्या अटकेनंतर आता पोलिसांनी त्याच्या पुढील चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले आहे.