दैनिक स्थैर्य | दि. ३० मे २०२३ | सातारा |
आम आदमी पार्टीच्या वतीने सामान्य माणसांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ‘पंढरपूर ते रायगड’ अशी स्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा सातार्यात १ जून रोजी येत असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक सागर भोगावकर व सातारा जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष रतन पाटील, सचिव मारुती जानकर, शहराध्यक्ष जयराज मोरे, कायदा विभागाचे सचिव मंगेश महामुलकर आदी यावेळी उपस्थित होते.
भोगावकर पुढे म्हणाले, ‘पंढरपूर ते रायगड’ अशी आम आदमी पार्टीच्या वतीने २८ मे ते ६ जून स्वराज्य यात्रा काढण्यात आली असून ती महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांतून जाणार आहे. यामध्ये पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, मुंबई, रायगड या जिल्ह्यांचा समावेश आहे. ही यात्रा एकूण दहा दिवस चालणार असून ७८२ किलोमीटरचा प्रवास होणार आहे. आम आदमी पार्टीला जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जनाधार तयार करणे, लोकांना भेडसावणार्या समस्यांना वाचा फोडणे, सध्याच्या काळातील सत्तेमधील वतनदारांना हटवून सर्वसामान्यांचे राज्य प्रस्थापित करणे, ही आम आदमी पार्टीचे उद्दिष्टे असून त्या उद्दिष्टांच्या प्रसारासाठी ही यात्रा काढण्यात आल्याचे भोगावकर यांनी सांगितले. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय सचिव गोपाल इटालिया यात्रेत सहभागी होणार आहे.
सातारा शहरात ही यात्रा १ जून रोजी सायंकाळी ५.०० वाजता बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथून शहरात येणार आहे. या यात्रेचे स्वागत होऊन सातार्यात आम आदमी पार्टीच्या वतीने रॅली काढण्यात येणार असून शाहू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे आम आदमी पार्टीच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.