
दैनिक स्थैर्य । दि. १९ ऑगस्ट २०२२ । सातारा । भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त दिनांक 9 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय सातारा यांचे वतीने स्वराज्य महोत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करणेत आला.
स्वराज्य महोत्सव अंतर्गत दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सातारा येथे नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत व्यसनमुक्ती आणि मादक पदार्थांच्या सेवनापासून समाज मुक्त करण्याकरीता शपथ घेणेत आली. या प्रसंगी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपआयुक्त स्वाती इथापे, सहायक आयुक्त समाज कल्याण सातारा नितीन उबाळे व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
नागरिकांनी निरोगी आयुष्यासाठी व्यसने व मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहिले पाहिजे, असे नितीन उबाळे सहायक आयुक्त समाज कल्याण सातारा यांनी या वेळी सांगितले.
स्वराज्य महोत्सवाचे औचित्य साधून सहायक आयुक्त समाज कल्याण सातारा यांचे वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सातारा येथे शनिवार दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.00 वा वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न झाला. जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा माधवी सरदेशमुख यांचे हस्ते वृक्ष लागवड करून कार्यक्रमाची सुरूवात करणेत आली. या प्रसंगी विविध वृक्षांची लागवड करणेत आली. या कार्यक्रमास जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपआयुक्त स्वाती इथापे, सहायक आयुक्त समाज कल्याण सातारा नितीन उबाळे व कर्मचारी उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त स्वराज्य महोत्सव अंतर्गत दिनांक 13 व 14 ऑगस्ट 2022 रोजी सामाजिक न्याय भवन सातारा येथे नितीन उबाळे सहायक आयुक्त समाज कल्याण सातारा यांचे हस्ते ध्वजारोहण करणेत आले. या कार्यक्रमास कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्यदिनानिमीत्त दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा माधवी सरदेशमुख यांचे हस्ते ध्वजारोहण करणेत आले. या वेळी माधवी सरदेशमुख यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. भारताने स्वातंत्र्यानंतर मोठी प्रगती केली असून यामध्ये नागरिकांचे मोठे योगदान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्रसंगी जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपआयुक्त स्वाती इथापे, सहायक आयुक्त समाज कल्याण सातारा नितीन उबाळे व इतर अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा जाती पडताळणी समितीच्या वतीने जात प्रमाणपत्रांचे वितरण करणेत आले. या प्रमाणपत्रासमवेत सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सातारा यांचे वतीने लाभार्थी व कार्यालयातील कर्मचारी यांना 75 पर्यावरण पूरक वृक्षांचे वितरण करणेत आले. सदर वृक्षांची योग्य निगा राखून त्यांचे संगोपन करावे, अशी अपेक्षा नितीन उबाळे सहायक आयुक्त समाज कल्याण सातारा यांनी व्यक्त केली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त स्वराज्य सप्ताह अंतर्गत दिनांक 17 ऑगस्ट 2022 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सातारा येथे समूह राष्ट्रगीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. नितीन उबाळे, सहायक आयुक्त समाज कल्याण सातारा यांनी स्वराज्य महोत्सवाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना, हर घर तिरंगा हा उपक्रम सातारा जिल्हयात आनंदमयी वातावरणात साजरा केल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरीक मोठया संख्यने उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त स्वराज्य महोत्सव अंतर्गत सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सातारा कार्यालयाचे अधिनस्त शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळा, समाजकार्य महाविद्यालय व विजाभज प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांध्ये विविध कार्यक्रम / उपक्रमांचे आयोजन करणेत आले होते. या उपक्रमाअंतर्गत निबंध, वकृत्व, चित्रकला, रांगोळी स्पर्धा, वृक्षारोपन, मानवी साखळी, चित्रप्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन, प्रभात फेरी, वाचन कार्यक्रम, व्यसनमुक्ती संकल्प, सामुहीक राष्ट्रगीत गायन कार्यक्रम व नृत्य, गायन स्पर्धा इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणेत आले होते. समता प्राथमिक आश्रमशाळा पाडेगाव येथे 321 फुट तिरंग्याच्या सहाय्याने भारताचा नकाशा साकारण्यात आला.
दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळा, समाजकार्य महाविद्यालय व विजाभज प्रवर्गाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळांमध्ये ध्वजारोहण करणेत आले.
स्वराज्य महोत्सवा अंतर्गत आयोजित करणेत आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचे अधिनस्त शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळा, समाजकार्य महाविद्यालय व आश्रम शाळांमधील 480 कर्मचारी 4250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या गौरवशाली पर्वानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सातारा या इमारतीस आकर्षक विद्युत रोषणाई करणेत आली होती.