स्वराज साखर कारखान्याकडून ऊस उत्पादकांना दिवाळी भेट; प्रति टन २० रुपये दराने साखर वाटप सुरू


स्थैर्य, फलटण, दि. ९ ऑक्टोबर : उपळवे येथील स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेड संचलित लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखान्याकडून, २०२४-२५ च्या हंगामात ऊस गाळप केलेल्या शेतकऱ्यांसाठी दिवाळीनिमित्त सवलतीच्या दरात साखर वाटप योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ आज गुणवरे येथे ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सातारा जिल्हा बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या योजनेअंतर्गत, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी पुरवलेल्या प्रति टन उसामागे १ किलो साखर, २० रुपये प्रति किलो या माफक दराने दिली जाणार आहे. हे साखर वाटप आज, दि. ९ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विविध केंद्रांवरून केले जाईल.

साखर वाटपासाठी ढवळपाटी (गिरवीसाठी), कुरवली बुद्रुक पाटी (कोळकीसाठी), राजाळे, काळज, साखरवाडी, गुणवरे यांसारखी एकूण १५ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी आपापल्या गटातील संबंधित केंद्रांवर संपर्क साधून वेळेत साखरेचे वाटप घेऊन जावे, कारण दिलेल्या कालावधीनंतर साखर वाटप केली जाणार नाही, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.

यावेळी विशाल माने – पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!