दैनिक स्थैर्य । दि.३१ डिसेंबर २०२१ । फलटण । शेरेचीवाडी (ढ) येथील सुपुत्र आणि छत्रपती शिवाजी हायस्कूल वडूज ता. खटाव या विद्यालयाचा विद्यार्थी चि. स्वराज महादेव चव्हाण यांने इयत्ता पाचवी मध्ये घेतल्या जाणार्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभागातून महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ऑगस्ट 2021 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत स्वराजने 300 पैकी 296 गुण मिळवून शिष्यवृत्तीधारक गुणवत्ता यादीत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. स्वराजने आजपर्यंत विविध स्पर्धात्मक परीक्षा, वक्तृत्व स्पर्धा यांमधून सातत्याने आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे.
खटाव तालुक्यामध्ये इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी साठी घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षांमधून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी होण्याची संख्या राज्यस्तरावर नेहमीच उल्लेखनीय राहिलेली आहे. राज्य गुणवत्ता यादीत खटाव तालुक्यातील विद्यार्थी सातत्याने चमकत असल्याने “खटाव शिष्यवृत्ती पॅटर्न” चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. स्वराजच्या यशामागे त्याचे वर्गशिक्षक गायकवाड सर, मार्गदर्शक शिक्षक देशमुख सर, हुंबे सर, वाघमारे मॅडम, मुख्याध्यापक जाधव सर व प्राथमिक शिक्षक असलेले त्याचे आई-वडील व आजी-आजोबा या सर्वांचे परिश्रम आहेत.
स्वराजच्या या अलौकिक यशाबद्दल सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, खटाव पंचायत समितीचे सभापती सौ. जयश्री कदम, उपसभापती हिराचंद पवार, पंचायत समिती सदस्य संतोष साळुंखे, शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, गटविकास अधिकारी उदयसिंह साळुंखे, गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे, विस्तार अधिकारी लक्ष्मण पिसे, केंद्रप्रमुख यादव साहेब तसेच शेरेचीवाडी येथील सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.