अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या पादुकांचे फलटणमध्ये आगमन; दर्शनासाठी गर्दी


अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या राजघराण्यातील पादुकांचा दर्शन सोहळा फलटणमध्ये उत्साहात पार पडला. गजानन चौक ते श्रीराम मंदिर अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पादुका पूजन झाले.

स्थैर्य, फलटण, दि. १० डिसेंबर : अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांनी अक्कलकोट येथील तत्कालीन नरेश मालोजीराजे भोसले (व्दितिय) राजघराण्याला दिलेल्या पवित्र पादुकांचा दर्शन सोहळा बुधवारी (दि. १०) सकाळी फलटणमध्ये दाखल झाला. गजानन चौक येथे या सोहळ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी ‘श्री स्वामी समर्थ’ च्या जयघोषाने आणि ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

गजानन चौकात जंगी स्वागत

अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्ट आणि मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले (तिसरे) यांच्या पुढाकाराने हा पवित्र पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी १० वाजता पादुका गजानन चौक येथे आल्यानंतर माजी खासदार संजीवराजे नाईक निंबाळकर आणि उपस्थित स्वामी भक्तांनी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले. पादुका पालखीत ठेवल्यानंतर संजीवराजे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.

भक्तीमय वातावरणात भव्य मिरवणूक

पूजनानंतर पालखी सोहळा गजानन चौकातून श्रीराम मंदिराकडे मार्गस्थ झाला. या मिरवणुकीत महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन, मंगल कलश आणि हातात भगवे ध्वज घेतले होते. प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मिरवणुकीत मालोजीराजे भोसले, जयप्रभादेवी राजेभोसले, सयाजी राजेभोसले आणि पुजारी पवन कुलकर्णी सहभागी झाले होते. ढोल-ताशा आणि तुतारीच्या निनादात पादुकांचे श्रीराम मंदिर प्रवेशद्वारावर स्वागत करण्यात आले.

राजवाड्यात आणि मंदिरात विधिवत पूजा

सुरुवातीला श्रीराम मंदिरात संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पादुकांची पूजा आणि आरती झाली. त्यानंतर मुधोजी मनमोहन राजवाड्यातील मंदिरात सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पादुकांवर अभिषेक, पूजा आणि आरती करण्यात आली. यावेळी रघुनाथराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.

दिवसभर दर्शनासाठी रीघ

राजवाड्यातील पूजेनंतर पादुका पुन्हा श्रीराम मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. दिवसभर स्वामी भक्तांनी आणि फलटणकरांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी आणि श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष संजय चोरमले व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!