मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वच्छता दिंडीचा समारोप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२३ । पंढरपूर । पंढरीची वारी व पालखी सोहळ्याच्या  माध्यमातून स्वच्छतेचा मूलमंत्र राज्यातील घराघरात पोहोचेल आणि स्वच्छता अभियान लोकचळवळ बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे स्वच्छता दिंडी समारोप समारंभात बोलताना व्यक्त केला.

पंचायत समिती पंढरपूरच्या आवारात पाणी पुरवठा व स्वच्छता आणि ग्रामविकास विभागाच्या वतीने आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील स्वच्छता दिंडी व ग्रामसभा  दिंडी 2023 समारोप मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाला, यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आमदार भरत गोगावले, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी  आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, गेल्या 17 वर्षापासून स्वच्छता दिंडी काढण्यात येत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू केल्यामुळे नागरिक स्वच्छतेबाबत जागरुक झाले आहेत. स्वच्छतेची लोकचळवळ होणे ही समाधानकारक बाब आहे. पंढरपूर येथे सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी, कचरा व्यवस्थापन चांगल्यारितीने झाले आहे.

पंढरपूरच्या वारीला शतकानुशतकांची परंपरा आहे. यात मोठ्या प्रमाणात वारकरी सहभागी होतात. त्यामुळे शासन-प्रशासनाची जबाबदारी वाढते आहे. अशावेळी स्वच्छतेचे नियोजन आणि इतर सुविधा चांगल्याप्रकारे देण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. विशेषत: स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. शासन वारकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगून त्यांनी स्वच्छता दिंडीत सहभागी वारकरी बंधु-भगिनींचे अभिनंदन केले.

वारकाऱ्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व जनतेला देण्याचा  आणि 700 ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याचा निर्णय शासनाने मंत्रीमंडळ बैठकीत घेतला आहे, असे  मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

यावर्षीच्या  आषाढी वारीत पंढरपूर येथे स्वच्छतेचे चांगले नियोजन करण्यात आले आहे. प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी चांगले काम केल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.

यावेळी गरीब कुटुंबातील विद्यार्थींनींना ग्रामविकास मंत्री श्री.महाजन यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात वितरण करण्यात आले.  पंढरपूर पंचायत समितीतर्फे 300 विद्यार्थीनींना सायकल देण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात ‘सायकल बँक’च्या माध्यमातून 3 हजार विद्यार्थीनींना सायकल देण्यात आल्या आहेत.

प्रास्ताविकात श्री. स्वामी यांनी स्वच्छता दिंडीविषयी माहिती दिली. स्वच्छता दूतांचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या 17 वर्षापासून या दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे. दोन्ही पालखी मार्गावरील 74 ग्रामपंचायती सोलापूर जिल्ह्यातील पालखी मार्गांवर येतात. या मार्गावर स्वच्छतेसोबत स्नानगृह, महिलांना आरोग्य सुविधा, फिरते आरोग्य पथक आदी सुविधा देण्यात आल्याने वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सोलपूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दत्तात्रय येवडे आणि  संजय बिदरकर यांनी जनजागृतीपर सादरीकरण केले.


Back to top button
Don`t copy text!