मौखिक आरोग्याच्या जनजागृतीसाठी ‘स्वच्छ मुख अभियान’ उपयुक्त ठरेल – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ मार्च २०२३ । मुंबई । मौखिक आरोग्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. राज्य शासनामार्फत राबविण्यात येणारे ‘स्वच्छ मुख अभियान’ मौखिक आरोग्य जपण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

२० मार्च या जागतिक मौखिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ‘स्वच्छ मुख अभियाना’चे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, डॉ. विवेक पाखमोडे यांच्यासह दंत वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थी उपस्थित होते.

मंत्री श्री.महाजन म्हणाले की, आजपासून राज्यातील सर्व शासकीय दंत महाविद्यालयात स्वच्छ मुख अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. येत्या काळात या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच सर्वसामान्यांमध्ये मौखिक स्वच्छतेबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. चुकीच्या आहार पद्धती, व्यायामाचा अभाव, व्यसनाधीनता, वाढता ताण- तणाव यामुळे लोकांमध्ये विविध व्याधीचे प्रमाण वाढते आहे. ही बाब चिंताजनक असून नागरिकांना निरोगी राहण्यासाठी नेमके काय खावे याबाबतही जनजागृती करणे आवश्यक आहे.

आपला देश हा तरुणांची सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. मात्र आजची तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी जात आहे ही बाब चिंताजनक आहे. आजही अनेक नागरिक गुटखा, खर्रा, तंबाखू, मावा, पानमसाला इत्यादीचे सेवन करत असल्याने अशा प्रकारच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली असली, तरी देखील सेवन केले जात आहे ही बाब गंभीर आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने लोकांना व्यसनाधीनतेपासून परावृत्त केले, तरी मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊ शकते. त्यामुळे मौखिक आजारांचे प्रमाण कमी होऊ शकते. स्वच्छ मुख अभियान ठराविक कालावधीसाठी न राहता निरंतर प्रक्रिया बनावी, असे सचिव डॉ. जोशी यांनी यावेळी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!